खोपोलीजवळ अवैध माती उत्खनन
By Admin | Updated: March 10, 2016 02:20 IST2016-03-10T02:20:24+5:302016-03-10T02:20:24+5:30
तालुक्यात अनधिकृत उत्खनन सुरू असल्याचा आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजरोसपणे खोपोली शहराजवळ असणारा डोंगर पोखरला जात असताना

खोपोलीजवळ अवैध माती उत्खनन
खालापूर : तालुक्यात अनधिकृत उत्खनन सुरू असल्याचा आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजरोसपणे खोपोली शहराजवळ असणारा डोंगर पोखरला जात असताना मातीमाफियांविरोधात कारवाईची मागणी होत आहे. शासकीय सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत असल्याने खालापूर प्रशासन भरारी पथकद्वारे यावर नियंत्रण मिळवणार आहे.
खालापूर तहसीलदार अजित नैराळे यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ खोपोली-पेण मार्गावरील तांबाठी येथील गोदरेज कंपनीमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या उत्खननाला चाप लावत तब्बल २ कोटी ५७ लाखांचा दंड ठोठावल्याने नैराळे यांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. मात्र संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात दगड-मातीचे उत्खनन सुरू असल्याने त्याच्या तक्रारी तहसील कार्यालयात दाखल होत आहेत. खोपोली शहराजवळील हॉटेल रिशीवनसमोरील डोंगर गेली अनेक वर्षे पोखरला जात आहे. अलीकडे पाली फाटा येथे नव्याने निर्माण केल्या जाणाऱ्या ट्रक टर्मिनलच्या भरावासाठी याच ठिकाणाहून मातीचे उत्खनन सुरू आहे. शनिवार, रविवार आणि इतर सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पोकलेन मशिन, डंपरच्या साहाय्याने मातीचे उत्खनन करून वाहतूक करण्यात येत असल्याने मातीमाफिया प्रशासनाला अंधारात ठेऊन मातीची तस्करी करीत आहेत. डोंगर पोखरला जात असताना महसूल अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेऊन कडक कारवाईची मागणी होत आहे. जमीनमालक आणि उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत महसूल प्रशासनाकडून मिळत आहेत .