उरणमधील रस्त्यावर अवैध पार्किंग
By Admin | Updated: March 14, 2017 02:10 IST2017-03-14T02:10:22+5:302017-03-14T02:10:22+5:30
उरण द्रोणागिरी नोड परिसरात सिडको, जेएनपीटीने अवजड वाहनांसाठी अधिकृतपणे वाहने पार्किंगची व्यवस्था करुन दिली असली तरी हजारो वाहने

उरणमधील रस्त्यावर अवैध पार्किंग
उरण : उरण द्रोणागिरी नोड परिसरात सिडको, जेएनपीटीने अवजड वाहनांसाठी अधिकृतपणे वाहने पार्किंगची व्यवस्था करुन दिली असली तरी हजारो वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जात आहेत. अनधिकृत पार्किंगकडे वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आर्थिक साटेलोेटे असल्यानेच त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस चालढकलपणा करीत असल्याचा आरोप होत आहे.
वाहतूक नियंत्रण विभागाच्या अनधिकृत पार्र्किंगकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने उरण परिसरात वाहतूक कोंडीची समस्या वाढतच चालली आहे. यामुळे मात्र अधिकृत पार्किंग करणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामारे जावे लागत आहे. उरण परिसरात जेएनपीटी, डी.पी.वर्ल्ड, जीटीआय अशी तीन अत्याधुनिक बंदरे आहे. त्याशिवाय ओएनजीसी, जीटीपीएस, एनएडी, बीपीसीएलसारख्या कंपन्यांबरोबरच अनेक रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. जेएनपीटी बंदर आणि त्या आधारित असलेल्या शेकडो कंटेनर गोदामातून मोठ्या प्रमाणात कंटेनर आयात-निर्यातीच्या मालाबरोबरच इतर मालाची वाहतूक प्रचंड प्रमाणात केली जाते. परिसरात कंटेनर मालाची ने-आण करणाऱ्या हजारो वाहनांसाठी सिडको, जेएनपीटीने अनेक ठिकाणी अधिकृतपणे पार्र्किंगची व्यवस्थाही केली आहे. परंतु अशा अधिकृत पार्किंगची संख्या अपुरी आहे. तसेच त्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने अनेक वाहने अनधिकृतपणे मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्र्किंग करतात. दुतर्फा रस्त्यांच्या बाजूने अनधिकृतपणे उभ्या करण्यात येत असलेल्या पार्किंगमुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
उरण, द्रोणागिरी परिसरात दुतर्फा रस्त्यांच्या बाजूला अवैधपणे पार्र्किंग करणाऱ्या वाहनांवर वाहतूक नियंत्रण पोलीस विभागाने कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. वाहतूक कोंडीची समस्या वाढण्याबरोबरच भविष्यात एखाद्या दुर्घटनेची शक्यता दिवसेंदिवस बळावत आहे.