एपीएमसी मार्केटमध्ये अवैध कारखाने
By Admin | Updated: November 12, 2015 02:07 IST2015-11-12T02:07:27+5:302015-11-12T02:07:27+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमध्ये मंगळवारी रात्री फटाक्यांमुळे आग लागली. या दुर्घटनेमुळे मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या बदाम

एपीएमसी मार्केटमध्ये अवैध कारखाने
नामदेव मोरे, नवी मुंबई
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला मार्केटमध्ये मंगळवारी रात्री फटाक्यांमुळे आग लागली. या दुर्घटनेमुळे मार्केटमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या बदाम फोडण्याच्या कारखान्याचे बिंग उघडकीस आले आहे. महापालिकेची व एपीएमसीची परवानगी न घेताच या ठिकाणी कारखाने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आशिया खंडामधील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यापारी सर्व नियम धाब्यावर बसवू लागले आहेत. अनेक बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. मंगळवारी रात्री मसाला मार्केटच्या जी ३६ या गाळाला आग लागली. आगीमध्ये फारसे नुकसान झाले नसले, तरी या गाळ्यात बेकायदेशीर व्यापार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्केटमध्ये फक्त गोडाउनमध्ये माल ठेवता येतो. पोटमाळ्यावर व्यापाऱ्यांचे कर्मचारी, हिशेब वह्या यासाठी पेढी तयार करून दिली आहे, परंतु बहुतांश व्यापाऱ्यांनी चक्क दोन मजले बांधकाम केले आहे. आग लागलेल्या गाळ्यामध्येही गोडाउनच्या वर दोन पोटमाळे तयार केले होते. गोडाउनमध्ये बदाम फोडण्याचे एक व छतावर तीन मशीन ठेवण्यात आल्या आहेत. वास्तविक, शहरात धान्य दळण्याची चक्की सुरू करायची असली, तरी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. बाजारसमितीमध्ये बदाम फोडण्याचा कारखाना सुरू असून, त्यासाठी कोणतीच परवानगी घेतलेली नाही.
ज्या गाळ्याच्या छतावर आग लागली, त्या व्यापाऱ्याने अनधिकृतपणे लाकडी शेडही बांधली होती. ती शेड पूर्णपणे जळूून गेली आहे. शेजारच्या चार गाळ्यांवरील शेडही जळाली आहे. सर्वच व्यापाऱ्यांनी बेकायदेशीरपणे व एपीएमसीची परवानगी न घेता, शेड टाकली आहेत. पोटमाळ्यावर बदाम निवडण्याचे काम केले जात आहे. गोडाउनमध्ये अत्यंत दाटीवाटीने माल ठेवण्यात आला आहे. आग लागली, तर ती विझविण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आली नव्हती. बाजारसमितीमधील जाणकारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अनेक ठिकाणी बदाम फोडण्याचे कारखाने विनापरवाना सुरू आहेत, परंतु त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. बाजारसमिती प्रशासनाने पूर्ण मार्केटचे सर्वेक्षण करून अतिक्रमण करणाऱ्या व बेकायदेशीरपणे गाळ्यांमध्ये कारखाना सुरू करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व संबंधितांवर मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली जात आहे. महापालिकेने ही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.