मानसिकता बदलली, तर काहीही शक्य
By Admin | Updated: December 10, 2015 01:57 IST2015-12-10T01:57:12+5:302015-12-10T01:57:25+5:30
सर्वांच्या सहकार्यातून पिगोंडे ग्रामपंचायत यापूर्वीच हागणदारीमुक्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत स्वच्छता मोहिमेला प्रत्येकाने सहकार्य करणे जरु रीचे

मानसिकता बदलली, तर काहीही शक्य
नागोठणे : सर्वांच्या सहकार्यातून पिगोंडे ग्रामपंचायत यापूर्वीच हागणदारीमुक्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत स्वच्छता मोहिमेला प्रत्येकाने सहकार्य करणे जरु रीचे असून या ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता मोहिमेवर भर दिला जात आहे, ही अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आजच्या जनजागृती फेरीमध्ये विद्यार्थी तसेच ग्रामस्थांबरोबर मी सुद्धा फिरलो, एखादे चांगले उद्दिष्ट पूर्ण करताना मानसिकता बदलली, तर काहीही साध्य करता येते असा माझा अनुभव आहे. आपल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती लवकरच आपल्याकडे येणार असून पुन्हा एकदा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी सर्वांनी आजपासून कामाला लागावे, असे आवाहन रोहे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. एन. भामुद्रे यांनी केले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत विभागातील पिगोंडे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर घेतलेल्या कार्यक्र मात मार्गदर्शनपर भाषणात भामुद्रे बोलत होते. यावेळी सरपंच नंदिनी बडे, उपसरपंच गंगाराम मिणमिणे, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र लवटे, संतोष कोळी, सुधाकर पारंगे, शैला बडे आदी मान्यवरांसह विभागातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक,सर्व शाळांचे विद्यार्थी तसेच शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बळीराम बडे, राजेंद्र लवटे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
(वार्ताहर)