शिवरायांच्या विचारांचा विदेशातही प्रसार
By Admin | Updated: October 27, 2015 00:23 IST2015-10-27T00:23:12+5:302015-10-27T00:23:12+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचारांचा जगभर प्रसार करण्यासाठी राजश्री शिवबा प्रसारक मंडळ पाच वर्षांपासून परिश्रम घेत आहे.

शिवरायांच्या विचारांचा विदेशातही प्रसार
प्राची सोनवणे, नवी मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचारांचा जगभर प्रसार करण्यासाठी राजश्री शिवबा प्रसारक मंडळ पाच वर्षांपासून परिश्रम घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेसात लाख प्रतिमा भारतासह जगातील दहा देशांमधील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. अमेरिकेमध्येही महाराजांचे विचार रूजविण्याचे काम सुरू केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध व व्यवस्थापन कौशल्याने जगभरातील इतिहासप्रेमींसह व्यवस्थापन शास्त्राचे धडे गिरविणाऱ्यांना प्रभावित केले आहे. अनेक देशांमधील नागरिक शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करत आहेत. नवी मुंबईमध्ये पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळानेही देश -विदेशातील घराघरांमध्ये छत्रपतींचे विचार पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वासुदेव कामत यांनी काढलेल्या शिवरायांच्या चित्राची प्रतिमा मोफत नागरिकांना वितरीत केली जात आहे. भारतामधील जवळपास सर्व राज्यांमध्ये ही प्रतिमा पोहोचविण्यात आली आहे. विदेशात अमेरिका, लंडन, मॉरिशस, दुबई, इस्त्रायल, पेरु, कतार, आॅस्ट्रेलिया, बहरीन, नायजेरिया यासारख्या देशांमध्येही महाराजांची प्रतिमा देण्यात आली आहे. मंडळाचे कार्यकर्ते फक्त प्रतिमा देत नाहीत, ज्या व्यक्तीला ही प्रतिमा दिली जाते त्यांना शिवरायांच्या पराक्रमाची माहिती दिली जाते. महाराजांचे गड, कोट, किल्ले, त्यांचे व्यवस्थापन कौशल्य याची माहिती दिली जात आहे. शिवप्रेमींच्या कार्याने भारावून गेलेले विदेशी नागरिकही एकमेकांना भेटल्यानंतर ‘जय शिवराय’ म्हणू लागले आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, गडकिल्ले, मंदिर, शाळा-महाविद्यालये तसेच शासकीय आणि खाजगी कार्यालयातही शिवकार्याविषयी माहिती दिली जाते. देशातील प्रत्येक घरात एक शिवप्रतिमा असावी या उद्देशाने ही संस्थेचे कार्य सुरु आहे. या संस्थेचे संस्थापक विजयदादा खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली १९ फेब्रु्रवारी २०१० साली या संस्थेची स्थापना झाली. योगेश खिलारे हा अमेरिकेत शिवकार्याच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य करत आहे. तो अमेरिकेतील कार्निवल प्राईड क्रुझवर शेफ म्हणून कार्यरत आहे. त्या ठिकाणी काम झाल्यानंतर मिळणारा वेळ छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची माहिती देण्याचे व शिवरायांविषयी माहितीचा प्रसार करण्यासाठी खर्च करत आहे. राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाच्या माध्यमातून गडकोट मोहिमांपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. नि:स्वार्थपणे हजारो तरूण किल्ल्यांची साफसफाई करण्यापासून विविध उपक्रम राबवत असून संस्थेच्या कामाविषयी विदेशातील भारतीयांनाही आदर वाटू लागला असून ते विदेशात छत्रपतींचे विचार पोहोचविण्याचे काम करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य महाराष्ट्रामध्येच नाही तर देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी ठरले आहे. देशासह पूर्ण विश्वभर शिवरायांचे विचार पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शिवरायांची प्रतिमा व त्यांच्या कामाची माहिती विविध देशांमध्ये पोहोचविली जात आहेत. आतापर्यंत दहापेक्षा जास्त देशांमध्ये शिवकार्याचा प्रसार सुरू आहे. याशिवाय राज्यातील विविध गड, किल्ल्यांची साफसफाई व इतर उपक्रम राबविले जात आहेत.
- विजयदादा खिलारे, संस्थापक, राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ