उद्यानाच्या कामात अडथळे

By Admin | Updated: January 3, 2016 00:31 IST2016-01-03T00:31:14+5:302016-01-03T00:31:14+5:30

वीज वितरण कंपनीच्या दिरंगाईमुळे पालिकेच्या उद्यानाचे काम रखडले आहे. वीजपुरवठा न दिल्याने चार महिन्यांपासून ऐरोलीतील या उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम ठप्प

Hurdles in garden work | उद्यानाच्या कामात अडथळे

उद्यानाच्या कामात अडथळे

नवी मुंबई : वीज वितरण कंपनीच्या दिरंगाईमुळे पालिकेच्या उद्यानाचे काम रखडले आहे. वीजपुरवठा न दिल्याने चार महिन्यांपासून ऐरोलीतील या उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम ठप्प झाले आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांची गैरसोय होत असून, उद्यानाच्या जागेत गैरप्रकाराला थारा मिळत आहे.
ऐरोली सेक्टर ५ येथील चिंचवली तलावाच्या विकासाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. यानुसार खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून उद्यानाचे नूकतणीकरण केले जात आहे. या विकासकामांतर्गत सदर उद्यानात बुद्ध गार्डन, थीम पार्क बनवले जाणार आहे. मात्र दीड वर्षापासून सुरू असलेले हे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. मागील चार महिन्यांपासून त्या ठिकाणचे काम पूर्णपणे ठप्प झालेले आहे. त्यामुळे पडून असलेल्या बांधकाम साहित्यामुळे उद्यानाला बकालपण आले आहे. शिवाय रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी गर्दुल्ल्यांच्या पार्ट्याही रंगत आहेत. यामुळे परिसरातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पालिकेने सुरू केलेल्या विकासकामामुळे सुविधेच्या नावाखाली या उद्यानात गैरसोयीच वाढल्याची खंतही त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. तर ऐन उन्हाळ्यात तरी या उद्यानाचा उपयोग होईल की नाही, याबाबतही त्यांच्याकडून शंका व्यक्त होत आहे. मात्र उद्यानाच्या कामाला होत असलेल्या विलंबाला वीज वितरण कारणीभूत असल्याचे पालिकेचे कार्यकारी अभियंता हरीश चिचारीया यांनी सांगितले. उद्यानात काम करण्यासाठी वीज आवश्यक असून, ती मिळण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे मागणी केलेली आहे. मात्र चार महिने होऊनही वीज वितरण कंपनीने वीज न दिल्याने उद्यानाचे काम थांबले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Hurdles in garden work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.