शहरात कोट्यवधींची उलाढाल
By Admin | Updated: October 23, 2015 01:12 IST2015-10-23T01:12:57+5:302015-10-23T01:12:57+5:30
उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा... नवे-जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा... अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन नागरिकांनी दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला.

शहरात कोट्यवधींची उलाढाल
नवी मुंबई : उत्सव आला विजयाचा, दिवस सोने लुटण्याचा... नवे-जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा... अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन नागरिकांनी दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त शहरातील बऱ्याच ठिकाणी रावणाचे दहन करण्यात आले
दसऱ्याच्या स्वागतासाठी महिलांची पहाटेपासूनच लगबग सुरू होती. त्यांनी दारी रांगोळ्या काढल्या. बच्चे कंपनीने आपली सायकल, बाबांची गाडी धुऊन काढत वाहनांची पूजा केली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याच्या मुहूर्तावर काहींनी घरी नवी वाहने आणली, तर अनेकांनी गृहप्रवेश केला. सोन्याचा दिवस म्हणून ओळख असणाऱ्या या दिवशी अनेकांनी सोने-चांदीच्या खरेदीचा शुभ मुहूर्त गाठला. नवरात्रोत्सवाची सांगता आणि विजयादशमीचा आनंद साजरा करण्यासाठी गृहिणींनी गोडा-धोडाच्या स्वयंपाकाचा बेत आखला होता. अनेकांच्या घरांमधून पुरणपोळी, बासुंदी, श्रीखंड अशा गोड पदार्थांसह सुग्रास भोजनाच्या पंक्ती उठल्या.
सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातूनही शुभेच्छांचा वर्षाव
यंदा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या सोशल नेटवर्किंग साईट्सवर संदेश खरोखरच सामाजिक क्रांती घडविणारे तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पाऊल उचलायला लावणारे होते. एक पान तोडण्यापेक्षा एक एक झाड लावू यात, आपट्याची पाने तोडून वाटण्यापेक्षा आपट्याची रोपे वाटू यात, आपट्याची पाने देण्यापेक्षा फक्त हात जोडून म्हणा शुभ दसरा, सोन्यासाठी आपट्याचा हट्ट का हवा असे संदेश एकमेकांना फॉरवर्ड करत तरुणाईने पर्यावरणपूरक दसरा साजरा केला.
मिठाई खरेदीसाठी रांगा
सणासुदीच्या दिवसात मिठाई भेट देऊन मित्रपरिवार, नातेवाइकांमधील नातेसंबंध आणखी चांगले जपता येतात. यासाठी सकाळपासून शहरातील मिठाई विक्रेत्यांच्या दुकानांभोवती भल्या मोठ्या रांगा पहायला मिळाल्या.