नवी मुंबई : दिवाळीचा सण अवघ्या तीन दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील एपीएमसीतील बाजारपेठ गजबजली असून, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे वारंवार आवाहन करूनही नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याचे चित्र बाजारपेठांत दिसत आहे.
विविध रंगाचे आकाश कंदील, देशी आणि परदेशी बनावटीची विद्युत रोषणाई, खाद्यपदार्थ, मिठाई, फोर्मिंगचे दागिने आणि पणत्या, रांगोळ्यांनी बाजारपेठ सजली आहे. या बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांनी सामाजिक अंतराला फाटा देत, सरकारच्या नियमांचा अक्षरश: फज्जा उडालेला आहे.
गर्दीच्या अनेक ठिकाणी सॅनिटायझर, मास्कचा फारसा वापर होत नसल्याचे चित्र घणसोली नोड्स आणि गावठाण, तुर्भे मफको मार्केट, ऐरोली सेक्टर ४, वाशी सेक्टर ९ येथील मिनी मार्केट आणि एपीएमसी मार्केट परिसरात सध्या दररोज सायंकाळी दिसते आहे. असे असताना महापालिकेच्या विशेष भरारी पथकाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. सलग आठ महिने बंद असलेली बाजारपेठ काही दिवसांपूर्वी उघडल्यामुळे नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याने, व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.