स्वस्त कांदा विक्री केंद्रावर ग्राहकांची प्रचंड गर्दी
By Admin | Updated: September 1, 2015 04:44 IST2015-09-01T04:44:44+5:302015-09-01T04:44:44+5:30
महागाईपासून सामान्य नागरिकांची सुटका करण्यासाठी नेरूळमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू केले आहे. किरकोळ मार्केटमध्ये ७० ते ८०

स्वस्त कांदा विक्री केंद्रावर ग्राहकांची प्रचंड गर्दी
नवी मुंबई : महागाईपासून सामान्य नागरिकांची सुटका करण्यासाठी नेरूळमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू केले आहे. किरकोळ मार्केटमध्ये ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा या केंद्रावर ५६ रुपये किलो दराने विकला जात असून खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे.
कांदा व जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. कांदा ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. डाळींच्या किमती १२० ते १५० रुपयांवर गेल्या आहेत. सर्व भाज्यांचे दर ४० ते ६० रुपये किलो झाले आहेत. सामान्य नागरिकांना भाजी, डाळी, कांदा या वस्तूही परवडत नसल्यामुळे नेरूळ सेक्टर ६ मध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी डिसेंबर २०१४ मध्ये ना नफा ना तोटा तत्त्वावर स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू केले आहे. प्रत्येक सोमवारी मुुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून भाजीपाल्याची खरेदी केली असून त्या दरामध्ये ग्राहकांना विकली जात आहे. जवळपास ९ महिने हे केंद्र नियमितपणे चालविले जात आहे. प्रत्येक आठवड्याला जवळपास १ टन माल विक्रीसाठी आणला जात असून दोन तासांमध्ये त्याची विक्री होत आहे. सामाजिक कार्यकर्ते महादेव पवार व परिसरातील युवक विनामोबदला स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम करत आहेत.
स्वस्त भाजी केंद्रामध्ये सोमवारी चांगल्या प्रतीचा कांदा ५६ रुपये किलो दराने विकण्यात आला. भेंडी १० ते १२ रुपये व टोमॅटो १६ रुपये किलो दराने विकला जात होता. सेक्टर ६, सारसोळे परिसरात अल्प उत्पन्न गटामधील नागरिकांचे वास्तव्य आहे. स्वस्त दरात वस्तू मिळत असल्यामुळे ग्राहक प्रत्येक सोमवारी केंद्रावर गर्दी करत आहेत. याच धर्तीवर शहरात इतर ठिकाणी केंद्र सुरू केली तर कांद्यासह डाळींचे दर कमी होतील अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी व्यक्त केली आहे.