शॉर्टसर्किटमुळे घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:29 IST2019-12-16T23:29:35+5:302019-12-16T23:29:39+5:30
खारघरमधील घटना : ग्रिल तोडून एका महिलेची सुटका

शॉर्टसर्किटमुळे घराला आग
पनवेल : खारघर सेक्टर १२ मधील केंद्रीय विहार सोसायटीत सीएच १ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेत संपूर्ण घर खाक झाले.
आग लागली तेव्हा शाश्वती सिन्हा (६५) या घरात अडकलेल्या होत्या. खारघर, कळंबोली येथील अग्निशमन दलाच्या तीन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात आली. यावेळी खिडकीची ग्रील तोडून अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी सिन्हा यांना सुखरूप बाहेर काढले. संबंधित इमारतीतील अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित असल्याची माहिती केंद्रीय विहार सीएच १ च्या सचिव गीता चौधरी यांनी दिली.
घटनास्थळी भाजप शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल व नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी धाव घेतली. आगीची माहिती मिळताच,संपूर्ण केंद्रीय विहार सोसायटीतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
गेल्या आठवड्यातही खारघर सेक्टर १२ मधील चौदा मजली निलगिरी अपार्टमेंटला आग लागल्याची घटना घडली होती.
मीटर रुमला लागलेली आग आठव्या मजल्यापर्यंत पोहचल्याने ५० ते ६० रहिवासी या इमारतीमध्ये अडकेल होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालत सर्व रहिवाशांची सुखरूप सुटका केली होती.