होल्डिंग पाँडचे सुशोभीकरण गरजेचे
By Admin | Updated: September 14, 2015 23:50 IST2015-09-14T23:50:14+5:302015-09-14T23:50:14+5:30
कळंबोली नोडमधील सिंग सिटी रुग्णालयाजवळ पावसाच्या पाण्याचा निचरा करणासाठी होल्डिंग पाँडची निर्मिती करण्यात आली आहे. या होल्डिंग पाँडचे नवी
होल्डिंग पाँडचे सुशोभीकरण गरजेचे
कळंबोली : कळंबोली नोडमधील सिंग सिटी रुग्णालयाजवळ पावसाच्या पाण्याचा निचरा करणासाठी होल्डिंग पाँडची निर्मिती करण्यात आली आहे. या होल्डिंग पाँडचे नवी मुंबईच्या सागर विहारच्या धर्तीवर सुशोभीकरण करावे, यासाठी विरंगुळ्याचे केंद्र बनवावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
काही दिवसांपूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्थानिक कार्यालयाकडे याबाबत निवेदन देण्यात आले असून सिडकोने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता कामोठे सिग्नल ते रोडपाली रोड आणि खाडीलगत सिडकोने होल्डिंग पाँड तयार केला. या पाँडला पावसाळी नाले जोडण्यात आले असून खाडीत हे पाणी निघून जाते. जास्त पाऊस झाल्यास पंपाव्दारे पाँडमधील पाणी उपसण्याची सुविधा या ठिकाणी आहे. हा परिसर महामार्ग, तळोजा लिंक रोड आणि खाडीलगत आहे. सहा-सात किमीचा परीघ असल्याने या परिसराचा चांगल्या पध्दतीने विकास होवू शकतो.
सध्या होल्डिंग पाँडच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्याचबरोबर डेब्रिज व कचरा टाकला जात असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. हा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ राहावा, त्याचा वापर व्हावा अशी मागणी होत आहे.
कळंबोलीत विरंगुळ्याकरिता करवली नाक्यावर असलेले गार्डनवगळता दुसरे ठिकाण नाही. त्यामुळे होल्डिंग पाँड याकरिता चांगला पर्याय होईल, असा प्रस्ताव शिवसेनेचे शहरप्रमुख डी.एन. मिश्रा यांनी दिला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची भेट घेवून विविध प्रलंबित मागण्या, समस्या आणि प्रश्नावर चर्चा केली आहे. (वार्ताहर)
पाँडचे रूप बदलणार!
विसर्जन तलाव ते कामोठे सिग्नल हा जवळपास दोन कि.मी. पट्ट्याचा विकास होवू शकतो. त्याचबरोबर मार्बल मार्केटच्या पाठीमागील बाजूला सुशोभीकरण करण्यास मोठी संधी आहे. येथील वाढलेली झाडेझुडपे काढून त्या जागी फुलझाडे व शोभेच्या वृक्षांची लागवड करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. होल्डिंग पाँडला पिंचिग करून प्रशस्त असा जॉगिंग ट्रॅक विकसित होऊ शकतो असे दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. बसण्याकरिता आसन व्यवस्था, दिवाबत्ती, कारंजे, बोटिंगची सोय होऊ शकते.
होल्डिंग पाँड येथे विरंगुळा केंद्र बनवण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे. याविषयी वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर या ठिकाणी विरंगुळा केंद्र बनवण्याचा निर्णय घेण्यात येईल.
- किरण फणसे,
प्रशासकीय अधिकारी सिडको