पांडवकड्याच्या पाण्याने रोखला महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:28 PM2019-07-08T23:28:25+5:302019-07-08T23:29:11+5:30

खारघरजवळ कोपरा नाला फुटला : सायन-पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी; कोपरा पुलावरील वाहतूक दोन तास ठप्प

The highway stopped from the Pandavakad water | पांडवकड्याच्या पाण्याने रोखला महामार्ग

पांडवकड्याच्या पाण्याने रोखला महामार्ग

वैभव गायकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : खारघर शहरातील पांडवकडा धबधब्याचे पाणी वाहून नेणारा नाला सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास फुटला. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतूककोंडी झाली होती. पाच दिवसांपूर्वी हा नाला खचला होता तेव्हा सिडकोने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे सोमवारी नाला फुटल्याने महामार्ग पाण्यात गेला.


पनवेल परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून खारघर शहरातील पांडवकडा धबधबा ओसंडून वाहत आहे. पांडवकड्याचे पाणी शहरातील नाल्यातून कोपरा खाडीत जाऊन मिळते. कोपरा बस स्थानकाच्या मागील बाजूस नाला वळण घेतो, मात्र सकाळपासून अतिवृष्टीमुळे वळण घेतलेल्या जागेवर नाला फुटला आणि नाल्याचे पाणी मोठ्या प्रवाहात महामार्गावर आले. त्यामुळे कोपरा परिसरातील सायन-पनवेल महामार्ग पाण्याखाली गेला.


कोपरा पुलाखालून पाणी दुसऱ्या लेनवरही गेले. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. केवळ उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होती, मात्र वाहतुकीचा वेग मंदावला होता.
खारघरपासून सुरू झालेली वाहतूककोंडी बेलापूर खिंडीपर्यंत पोहचली होती तर दुसºया मार्गावरील वाहतूक खारघर टोल नाक्याच्या पुढे गेली होती. नाला फुटल्याने अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने कोपरा पुलाखालून जाणाºया गाड्या मोठ्या संख्येने उड्डाणपुलाखाली अडकल्या होत्या. पाण्याला वेग असल्याने अनेक चालकांनी वाहने पाण्यातच सोडून दिली. घटनेची माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोपरा नाल्यावरच खारघर शहरात जाण्यासाठी एक पूल उभारण्यात आला आहे.

पुलाच्या खाली असलेल्या पाइपमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साचल्याने पाण्याचा विसर्ग येथील फुटलेल्या नाल्यातून झाला. पालिकेच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत पाइपमधील कचरा काढून पाण्याला वाट करून दिल्याने नाल्यातील पाण्याचा विसर्ग थांबला. दुपारी ३ च्या सुमारास पावसाने उसंत घेतल्याने परिस्थिती पूर्ववत झाली. संबंधित घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी, कोपरा ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सुमारे दोन तास कोपरा उड्डाणपुलाखालून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
दोन ठिकाणी शार्टसर्किट
शॉकसर्किट व आग लागण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. रविवारी २४ तासामध्ये एक ठिकाणी आग व एक ठिकाणी शॉकसर्किट झाले होते. विजेचा धक्का लागून एकाला जीव गमवावा लागला होता. सोमवारी दोन ठिकाणी शॉकसर्किट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.


नऊ ठिकाणी पाणी साचले
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण ९ ठिकाणी पाणी साचले. एमआयडीसी, वाशी, एपीएमसी, नेरूळ, तुर्भेमधील रोड व नागरी वसाहतीमध्येही १ ते २ फूट पाणी साचले होते. अनेक ठिकाणी अग्निशमन दलाला व आपत्ती व्यवस्थापनाच्या विशेष तुकडीला पाठवावे लागले.
वृक्ष कोसळले
पावसाळा सुरू झाल्यापासून प्रतिदिन वृक्ष कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी घणसोलीमध्ये दोन वृक्ष कोसळले, याशिवाय जवळपास २० ठिकाणी फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. वृक्ष कोसळून शहरात गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
वाशी खाडीपुलावर वाहतूककोंडी
नवी मुंबई : वाशी खाडीपुलावर दोन वाहनांमध्ये किरकोळ अपघाताची घटना सोमवारी सकाळी घडली. यामुळे काही वेळासाठी मुंबईकडे जाणाºया लेनवर वाहतूककोंडी झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांमार्फत अपघातग्रस्त वाहने मार्गातून हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मुसळधार पावसामुळे शहरातले जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच नोकरी व्यवसाय निमित्ताने मुंबईच्या दिशेने जाणाºयांनाही वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. सोमवारी सकाळी वाशी खाडीपुलावर किरकोळ अपघाताची घटना घडली. यामध्ये अपघातग्रस्त वाहन रस्त्यावर थांबल्याने एक लेन वाहतुकीसाठी बंद झाली होती. परिणामी त्याठिकाणी वाहतूककोंडी होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर सुमारे एक तासानंतर अपघातग्रस्त वाहन त्याठिकाणावरून हटवल्यानंतर वाशी खाडीपुलावरील वाहतुक सुरळीत झाली.

Web Title: The highway stopped from the Pandavakad water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.