आरोग्यापेक्षा कचऱ्यावर जास्त खर्च

By Admin | Updated: September 3, 2015 03:05 IST2015-09-03T03:05:20+5:302015-09-03T03:05:20+5:30

शहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात महापालिकेस अपयश आले आहे. तीन वर्षांमध्ये वैद्यकीय सेवांवर २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Higher expenditure on waste than health | आरोग्यापेक्षा कचऱ्यावर जास्त खर्च

आरोग्यापेक्षा कचऱ्यावर जास्त खर्च

नामदेव मोरे, नवी मुंबई
शहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात महापालिकेस अपयश आले आहे. तीन वर्षांमध्ये वैद्यकीय सेवांवर २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. घनकचरा व मलनि:सारण विभागावर तब्बल ३४८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. करोडो रुपये खर्च करूनही शहरवासीयांना चांगल्या उपचारासाठी खासगी रुग्णालय व मुंबईला जावे लागत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सुविधा पूर्णपणे कोलमडली आहे. तुर्भे व नेरूळमधील माताबाल रुग्णालय बंद करण्यात आले आहे. कोपरखैरणे व ऐरोली माताबाल रुग्णालय फक्त नावापुरते सुरू आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा देता यावी यासाठी पालिकेने २००९ मध्ये ऐरोली, नेरूळ व बेलापूरमध्ये ८३ कोटी ४६ लाख रुपये खर्च करून तीन नवीन रुग्णालये बांधण्याचे काम सुरू केले होते. परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे हा खर्च १७० कोटी ६४ लाख रुपयांवर पोहचला आहे. रुग्णांसाठी फक्त वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचाच पर्याय शिल्लक राहिला आहे. त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे डॉक्टर रुग्णांना खाजगी रुग्णालय किंवा मुंबईला जाण्यास भाग पाडत आहेत. शहरात डेंग्यू, मलेरियाची प्रचंड साथ सुरू आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. नगरसेवकांच्या मुलालाही डेंग्यू झाला होता. अशा स्थितीमध्ये महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. मागील तीन वर्षांमध्ये आरोग्य सुविधेवर तब्बल २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पाच वर्षांत औषध खरेदीवर ११ कोटी खर्च झाला असून रुग्णवाहिकेसाठी १ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा प्रचंड खर्च करूनही शहरवासीयांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत.
महापालिकेने थेट वैद्यकीय सुविधेवर तीन वर्षामध्ये २०० कोटी खर्च केले असून आरोग्याशी संबंधित असणाऱ्या घनकचरा विभागावर मात्र याच कालावधीमध्ये २३० कोटी ९५ लाख व मलनि:सारण विभागावर ११७ कोटी २९ लाख रुपये खर्च केले आहेत. वैद्यकीय खर्चापेक्षा हा खर्च दीडपट जास्त आहे. मलनि:सारण विभागावर प्रचंड खर्च करूनही अद्याप ७० टक्के झोपडपट्टीवासीयांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. कोपरखैरणे, नेरूळ पूर्व व पश्चिम, सीवूड या परिसरामध्ये सार्वजनिक शौचालयच नाही. ठाणे बेलापूर रोड, पामबीच रोडवरही प्रसाधनगृह उभारण्यात आलेले नाही. कचरा उचलणे व वाहतुकीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. कचरा उचलल्यानंतर तिथे कीटकनाशक पावडर टाकली जात नाही. साफसफाई ठेकेदारही या पावडरचा वापर करत नाहीत. शहरात डासांचा उपद्रव रोखण्यासाठी धुरीकरण व औषध फवारणी योग्यप्रकारे होत नसून या सर्वांमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Web Title: Higher expenditure on waste than health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.