महाड तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By Admin | Updated: May 26, 2017 00:23 IST2017-05-26T00:23:18+5:302017-05-26T00:23:18+5:30

मे महिनाअखेर महाड तालुक्यामध्ये १२ गावे व ९६ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे उपलब्ध पाणीसाठे आटल्यामुळे गावातील

Heavy water shortage in Mahad taluka | महाड तालुक्यात भीषण पाणीटंचाई

महाड तालुक्यात भीषण पाणीटंचाई

सिकंदर अनवारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव: मे महिनाअखेर महाड तालुक्यामध्ये १२ गावे व ९६ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे उपलब्ध पाणीसाठे आटल्यामुळे गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध पाणी साठे आणि टंचाईग्रस्त गावे यांच्यातील अंतर लक्षात घेता टँकरद्वारे पाणीपुरवठ्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. याबाबीचा विचार केला तर ग्रामस्थांची तहान भागत नाही आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे अशा या टंचाईग्रस्त गावांमध्ये नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. खासगी विकतचे पाणी व शासनाकडून पुरवठा होणारे पाणी नदीनाल्यातून कोणत्याही तऱ्हेची फिल्टरेशन न करता नागरिकांना पुरवठा करण्यात येत असल्याने दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
महाड तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरी कोरड्या पडल्या असून अनेक गावातील पाण्याचे स्रोतही आटले आहेत. अनेक गावांतील नळपाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. कोतुर्डे धरणाचे पाणी आटल्यामुळे महामार्गालगत असलेल्या अनेक गावे व वाड्यांमध्ये एप्रिल महिन्यापासूनच पाणीटंचाईची झळ बसली होती. अशा टंचाईग्रस्त गावांना दरवर्षी महाड पंचायत समितीमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा तालुक्यातील पिंपळकोंड, पाचाड गाव, साकडी, सापे तर्फे तुडील, नेराव, धावरेकोंड, वाकी बुद्रुक, वडघड, पारमाची, माझेरी नाते, धुरुपकोंड अशा १२ गावांचे व ९६ वाड्यांचे टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी त्या त्या ग्रामपंचायतीमार्फत महाड पंचायत समितीकडे प्रस्ताव आले आहेत. मात्र सध्या १२ गावे व ८६वाड्यांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून हे पाणी अपुरे पडत आहे. यामुळे नागरिकांना तहान भागविण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहेत, तर अद्याप १० वाड्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पडून आहे.
महाड तालुक्यामध्ये सध्या १२ गावे व ९६ वाड्यांना आठ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. असे असताना पुन्हा १० वाड्यांना टँकरसाठी प्रस्ताव आला आहे व मंजुरीसाठी महाड तालुक्यामधून टँकर देण्यास कोणीही तयार नाही. याचे कारण शासनाकडून दरवर्षी टँकरमालकांच्या बिलांना विलंब लागत असल्याने निघणारी निविदा कोणीही भरण्यास तयार नाही. सध्या जे आठ टँकर सुरू आहेत त्यामध्ये देखील चार टँकर विजय ननावरे या सांगलीच्या ठेकेदाराचे आहेत. महाड तालुक्यात शेकडोने पाणीपुरवठ्याचे टँकर आहेत. ते सध्याच्या काळात कमाईचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या गावांना विकत पाणीपुरवठा करताना दिसून येत आहेत. शासनाच्या बिलास दोन-दोन वर्षे विलंबामुळे या विभागातील शासनाला कोणीही टँकर देण्यास तयार नाही. याच कारणामुळे सध्या महाड पंचायत समितीसमोर नवीन टँकर मागणीसाठी १० वाड्यांचा प्रस्ताव पडलेला आहे. शासनाच्या अशा कारभाराचा फटका नागरिकांना बसत असून पाण्याअभावी हाल होत आहेत.

दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता
१टंचाई काळात जलस्रोत आटल्यामुळे नदी-नाल्यात साठून राहिलेल्या पाण्याचा वापर खासगी अगर सरकारी यंत्रणेमार्फत पाणीपुरवठ्यासाठी केला जातो. या पाण्याचा वापर करताना कोणतीही शुद्धीकरण यंत्रणा वापरली जात नाही.
२शासनामार्फत होणाऱ्या टँकरद्वारे पाणीपुरवठ्यामध्ये टीसीसी पावडरचा वापर काही प्रमाणात केला जातो. तर खासगी टँकर चालक असे काही करत नाही. या दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी केल्यास साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
३पावसाळ्याच्या सुरुवातीला आरोग्य विभाग ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी टीसीएलचा वापर अगर क्लोरिन लिक्विडच्या वापर करण्याच्या सूचना गावपातळीवर करत असतात. पावसाळ्याप्रमाणे टंचाई काळात देखील मोठ्या प्रमाणात दूषित पाणी ग्रामस्थांमार्फत पिण्यासाठी पोहचत असतो.
४कोणतीही साथ पसरण्यापूर्वी आरोग्य यंत्रणेने पाणी शुद्धीकरणासाठी प्रयत्न सुरू केल्यास भविष्यात अनर्थ टळू शकतो. सध्या टँकरद्वारे पुरवठा होणारे पाणी शासकीय असो अगर खासगी असो ज्या ठिकाणाहून पाणी टँकरमध्ये भरले जाणार आहे त्या ठिकाणच्या पाण्याची चाचणी होणे गरजेचे आहे.

१२ गावे व ९६ वाड्यांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पुन्हा १० वाड्यांचा प्रस्ताव आला आहे. टँकर अपुरे आहेत. त्यामध्ये टंचाईग्रस्त गावे देखील तालुक्याच्या दोन वेगवेगळ्या टोकाला आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यास दमछाक होत आहे.
-एन. जी. मंडलिक, गटविकास अधिकारी, पंचायत समिती महाड

दूषित पाणीपुरवठा झाला तर कावीळ, टॉयफॉईड, उलटी, जुलाब, कॉलरा असे अनेक आजार उद्भवू शकतात. तरी ज्या ज्या ग्रामपंचायत हद्दीत किंवा नगरपालिका हद्दीत हा पाणीपुरवठा होत आहे. त्याची जबाबदारी आहे की त्यांनी या पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून ग्रामस्थांना पाणी देणे.
- डॉ. भास्कर जगताप, अधीक्षक महाड ग्रामीण रुग्णालय

गडबमध्ये पाण्यासाठी वणवणगडब (काराव) ग्रामपंचायत हद्दीतील गावांना जे.एस.डब्लू. कंपनीच्या पाइपलाइनवरून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या ठिकाणावरून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने गडब (काराव) ग्रामपंचायत हद्दीतील जनतेला पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा येथील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयास घेराव घातला; परंतु या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने येथील पाणीपुरवठ्याच्या समस्येबद्दल उग्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व अशुद्ध असल्याने साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात येथील लोकप्रतिनिधी व त्यांचे नेते मोठ्या दिमाखाने प्रचारात सामील होवून जनतेचे विविध प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देणारे नेते मात्र आता गायब झाले आहेत. येथील महिलांनी आक्र मक पवित्रा घेतल्याने महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याने या भागाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाबद्दल महिलांनी आक्र मक पवित्रा घेतला असून त्वरित येथील पाणीपुरवठ्याची समस्या सोडवावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.


म्हसळ्यातील ५ गावे, १५ वाड्यांमध्ये पाणी समस्या
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : म्हसळा शहरासह तालुक्यातील पाच गावे व १५ वाड्यांना तीव्र पाणीटंचाई भासत असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शहरात गेल्या वर्षीपेक्षा अधिक टंचाई भासत असून, २४ तासांत फक्त ३० ते ३५ मिनिटे पाणी सोडले जाते. गेली चार-पाच वर्षे नवीन योजनेचे पाणी मिळेल, या एकमेव आशेवर म्हसळ्यातील नागरिक प्रतीक्षेत आहेत. डिसेंबर २०१६मध्ये पाणीटंचाई आराखडा जिल्हा परिषदेकडे पाठविला असतानाही या गंभीर प्रश्नावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, यामुळे म्हसळ्यातील नागरिक संतप्त झाले आहेत.
तालुक्यात कुडगाव कोंड, गायरोने, तुरुंबाडी, रोहिणी, आडी ठाकूर या गावांमध्ये, तर चंदनवाडी, सांगवड, लेपआदिवासीवाडी, वाघाव बौद्धवाडी, कृष्ण नगर, बटकरवाडी, दगडघूम, निगडी मोहल्ला, रु द्रावट, चिचोंडे, खानलोशी बौद्धवाडी, गोंडघर बौद्धवाडी, पेढाबे आदिवासीवाडी, आंबेतकोंड विचारेवाडी, आंबेतकोंड रोहिदासवाडी, सुरई आदी वाड्यांचा समावेश आहे. तालुक्यात पाभरे आणि खरसई ही दोन धरणे आहेत. गेल्या काही वर्षांपासून पाभरे धरणातील पाणी म्हसळावासीयांना मिळेल, असे दरवर्षी ऐकून नागरिक सुखावतात. योजना येते, त्यावर निम्म्यापेक्षा अधिक पैसेही खर्च होतात. मात्र, पुन्हा अर्धवट कामे सोडून, ठेकेदार काम अर्धवट सोडतो. त्यावर पुन्हा निधी वाढवून दिला जातो, पुन्हा काही दिवसांनी काहीही काम न करता पैसे खर्च होतात आणि काम बंद होते. नागरिक मात्र पाणी यावर्षी येईल, पुढल्या वर्षी येईल, याच आशेवर आतुरतेने वाट पाहत असतात. कोकणात सर्वात जास्त पाऊस म्हसळ्यात पडतो. मात्र, प्रशासनाकडून योग्य नियोजन नसल्यामुळे नागरिकांना हे दुर्भीक्ष वारंवार सहन करावे लागते. नगरपंचायतीकडे शिक्षित टेक्निशियन नसल्यामुळे योग्य वेळी दुरु स्ती होत नाही.

Web Title: Heavy water shortage in Mahad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.