वायू प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: March 2, 2016 02:08 IST2016-03-02T02:08:09+5:302016-03-02T02:08:09+5:30
विकासाच्या नावाखाली पनवेल परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला आहे. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाबरोबर वायू प्रदूषणही वाढले आहे.

वायू प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात
नामदेव मोरे, नवी मुंबई
विकासाच्या नावाखाली पनवेल परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला आहे. कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाबरोबर वायू प्रदूषणही वाढले आहे. पूर्ण वर्षभर धूळ व धुलीकणांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलली नाहीत तर शहरवासीयांना श्वसनाचे व हृदयाशी संबंधित आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ व नैना क्षेत्रामुळे पनवेल देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जावू लागले आहे. ग्रामीण परिसरामध्येही मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. परंतु शहराची रचना करताना फक्त इमारतींची उभारणी व पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. पर्यावरण रक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास सुरू झाला आहे. गाढी नदीचे नाल्यात रूपांतर होवू लागले आहे. मँग्रोजचे जंगल नष्ट केले जात आहे. लोकवस्तीच्या प्रमाणात उद्यानांसाठी भूखंड राखीव ठेवलेले नाहीत. वाहनांची संख्या दहा वर्षांत जवळपास तिप्पट झाली आहे. या सर्वांमुळे वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.
पर्यावरण विभागाने २०१५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये हवेतील सल्फरडाय आॅक्साईड व नायट्रोजन आॅक्साईडचे प्रमाण नियंत्रणात असले तरी रेस्पीरेबल सस्पेंडेड पार्टीक्युलर मॅटर (आरएसपीएम) चे प्रमाण मात्र मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले आहे. धुलीकण हे सूक्ष्मकण व ऐरोसोल यांचे क्लिष्ट मिश्रण असून धुलीकण प्रदूषण या नावानेही ओळखले जातात. नायट्रेड व सल्फेटसारखी आम्ल, सेंद्रिय रसायने, धातू व धुलीकण यासारख्या घटकांचा समावेश असणाऱ्या घटकांपासून धुलीकणाची निर्मिती होत असते. १० मायक्रॉन व त्याहीपेक्षा कमी व्यास असलेले धुलीकण घसा व नाकामार्फत फुप्फुसात प्रवेश करू शकतात. श्वासामार्फत धुलीकण शरीरात गेल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम हृदय व फुप्फुसांवर होत असतो.
हवेतील आरएसपीएम १० ची मात्रा ८० ते १०० मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर असणे आवश्यक आहे. परंतु पनवेल शहरात हेच प्रमाण वर्षभरामध्ये जवळपास १३८ एवढे असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय हवेतील एसपीएमचे प्रमाण निवासी क्षेत्रामध्ये २०० मायक्रोग्रॅम क्युबिक मीटरपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. परंतु हे प्रमाणही सरासरी २२८ असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीमध्ये आढळून आले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखला नाही तर भविष्यात शहरवासीयांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सिडकोने साऊथ नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु स्मार्ट शहर बनविताना पर्यावरण रक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे.