गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ‘त्यांनी’ धरली कास
By Admin | Updated: September 5, 2015 03:10 IST2015-09-05T03:10:24+5:302015-09-05T03:10:24+5:30
नेरुळ येथे राहणाऱ्या आर. राधाकृष्णन यांनी शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी श्रीराम राधाकृष्णन ट्रस्टची सुरुवात केली

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ‘त्यांनी’ धरली कास
प्राची सोनवणे ,नवी मुंबई
नेरुळ येथे राहणाऱ्या आर. राधाकृष्णन यांनी शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी श्रीराम राधाकृष्णन ट्रस्टची सुरुवात केली. यंदा बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणासाठी ८०हून अधिक विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य केले आहे. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे काम करणाऱ्या व्यक्ती आपल्या वेतनाचा मोबदला गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरतात.
आर. राधाकृष्णन यांच्या मुलगा श्रीराम हा अत्यंत हुशार, तीक्ष्ण बुध्दीमत्तेचा होता. २०१२ साली टिबीने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलाच्या आठवणी कायमस्वरुपी टिकून रहाव्या तसेच शहरातील गरजू विद्यार्थ्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये या करिता श्रीराम राधेकृष्णन ट्रस्टची स्थापना केली. शिक्षणाची इच्छा असूनही आर्थिदृष्ट्या सक्षम नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांना या संस्थेमार्फत मदत केली जाते. आर राधाकृष्णन यांनी ठाणे परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीही बालवाडी सुरु केली आहे. या संस्थेच्या वतीने आॅगस्ट महिन्यापर्यंत ३ लाख, ९८ हजार, १३५ रुपयांची मदत करण्यात आली आहे. यामध्ये इंजिनियरींग, वाणिज्य, विज्ञान, कला, बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वर्षभरात ६ लाखाहून अधिक रुपयांची मदत विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या आर्थिक सहाय्यामुळे कित्येक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करत असून त्यांच्या शिक्षणाची वाट मोकळी झाली
आहे.