एक हापूस आंबा ९८ रुपयांना
By Admin | Updated: October 27, 2015 00:27 IST2015-10-27T00:27:25+5:302015-10-27T00:27:25+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रत्नागिरीमधून हापूसची पहिली पेटी विक्रीसाठी आली. आॅक्टोबरमध्ये पहिल्यांदाच आंबा बाजारात आल्यामुळे उत्साहाचे वातावरण होते

एक हापूस आंबा ९८ रुपयांना
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रत्नागिरीमधून हापूसची पहिली पेटी विक्रीसाठी आली. आॅक्टोबरमध्ये पहिल्यांदाच आंबा बाजारात आल्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. ५२ आंबे असलेली पेटी ५,१०० रुपयांना विकली गेली. एका आंब्याला ९८ रुपये दर मिळाला.
देशात आंब्याचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. कोकणातील हापूस आंब्याला जगभर मागणी असते. मुंबई बाजार समितीमध्ये मुहूर्ताच्या पेटीला खूप महत्त्व असते. प्रत्येक वर्षी जानेवारीदरम्यान आंब्याची पेटी विक्रीसाठी येते. परंतु यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधील हर्णैतील शेतकरी उदय नरवणकर यांच्या बागेमध्ये जुलैमध्येच मोहोर आला. दसऱ्याच्या दरम्यान आंबा पिकण्यास सुरुवात झाली. नरवणकर यांनी सव्वाचार डझनची पहिली पेटी विक्रीसाठी मुंबई बाजार समितीमधील व्यापारी दिनकर महाबरे यांच्याकडे पाठविली. सोमवारी आंब्याची पूजा करून लिलाव करण्यात आला.
आंब्याच्या पहिल्या पेटीला तब्बल ५,१०० रुपये बाजारभाव मिळाला आहे. एक आंबा ९८ रुपयांना विकला गेला. याविषयी महाबरे यांनी सांगितले, की पहिल्यांदाच एवढ्या लवकर आंबा विक्रीसाठी आला. यामुळे आंबा पाहण्यासाठी व घेण्यासाठीही अनेक जण आले होते. शेतकऱ्यांच्या समोर आंब्याची विक्री करण्यात आली. (प्रतिनिधी)