मिनीट्रेनसाठी नवी रेल्वे इंजिने हवीत
By Admin | Updated: February 16, 2016 02:43 IST2016-02-16T02:43:24+5:302016-02-16T02:43:24+5:30
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईपासून अगदी जवळ असल्याने येथे पर्यटकांची गदी असते. तसेच येथील झुकझुक गाडीची मजा लुटण्यासाठी वर्षाकाठी सात लाखांहून अधिक

मिनीट्रेनसाठी नवी रेल्वे इंजिने हवीत
माथेरान : माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईपासून अगदी जवळ असल्याने येथे पर्यटकांची गदी असते. तसेच येथील झुकझुक गाडीची मजा लुटण्यासाठी वर्षाकाठी सात लाखांहून अधिक पर्यटक आपल्या बालगोपाळांसह येत असतात. परंतु या मिनीट्रेनची इंजिने ही जुनी झालेली असल्याने नेहमीच काही ना काही कारणास्तव तांत्रिकदृष्ट्या बिघाडापाई अनियमित सेवा तसेच मध्येच घाटात बंद पडत असतात. या कामी नवीन इंजिन उपलब्ध केल्यास पर्यटकांचा प्रवास सुखकर होईल. यासाठी सहा इंजिने हवीत, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मनोज खेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माथेरानचा शोध लागून जवळपास १६० वर्षे होत आली, परंतु इथल्या स्थानिक परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. नेरळ -माथेरान रेल्वेसेवा सर आदमजी पिरभॉय या दानशूर व्यक्तीने स्वखर्चाने १९०७ मध्ये त्या वेळेस १६ लाख रु पये खर्चून सुरू केली. तेव्हापासून माथेरान खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले आहे. या ट्रेनची सफर करण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. या मिनीट्रेनची नाळ स्थानिकांसह पर्यटकांशी जुळलेली आहे. दस्तुरीपासून गावात येण्यासाठी तीन कि.मी.ची पायपीट करावी लागत होती. यासाठी राज्य शासनाने एमएमआरडीएमार्फत २००९ मध्ये अमन लॉज ते स्टेशनपर्यंत शटल सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएकडून ६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. प्रवासी वाढण्यासाठी रेल्वे इंजिन यंत्रणा सुलभ असणे गरजेचे आहे. शटलसेवेप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पात या महत्त्वपूर्ण प्रयोजनासाठी राज्य सरकारकडून तरतूद होणे आवश्यक आहे. नवीन इंजिन आल्यास इथल्या सर्वसामान्यांचा व्यवसाय पर्यटनवृद्धीमुळे कार्यक्षम होईल. त्यासाठी नवीन इंजिन देण्याची मागणी येथील स्थानिकांच्या वतीने मनोज खेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.