महामार्गालगतच्या अतिक्र मणांवर हातोडा!
By Admin | Updated: October 28, 2015 01:04 IST2015-10-28T01:04:28+5:302015-10-28T01:04:28+5:30
मुंबई - पुणे महामार्गालगत उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर लवकरच हातोडा पडणार आहे. त्यानुसार रस्ते विकास महामंडळाने संबंधित पाचशे जणांना नोटिसा बजावल्या आहेत

महामार्गालगतच्या अतिक्र मणांवर हातोडा!
प्रशांत शेडगे, पनवेल
मुंबई - पुणे महामार्गालगत उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर लवकरच हातोडा पडणार आहे. त्यानुसार रस्ते विकास महामंडळाने संबंधित पाचशे जणांना नोटिसा बजावल्या आहेत. इतर विभागाशी समन्वय साधण्याचे काम सुरू असून महामार्गावर एकही बांधकाम राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे.
कळंबोली सर्कलपासून एनएच ४ सुरू होत असून तो पनवेलमधून जातो. पूर्वी हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता, मात्र काही वर्षांपूर्वी तो रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. या मार्गावर रहदारी जास्त असल्याने पनवेल शहरालगत सतत वाहतूक कोंडी होते. ती फोडण्याकरिता इलेव्हेटेड मार्ग तयार करण्यात आला. मात्र एसटी बस स्थानकासमोरील व्यावसायिक झोपड्यांमुळे काही काम बाकी आहे. याशिवाय आंबेडकर पुतळा ते कोहिनूर टेक्निकल या दरम्यान परिस्थिती फारशी वेगळी नाही.
बीएड महाविद्यालय आणि आयटीआयलाही झोपड्यांचा विळखा पडला आहे. या ठिकाणी हॉटेल, गॅरेज, मोबाइल, किराणा दुकान, ट्रॅव्हल्सची कार्यालये थाटण्यात आली आहेत. रस्त्यावरील झोपडीचे कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त वीस हजार भाडे आकारले जात आहे. त्याचबरोबर कळंबोली सर्कल ते खांदा वसाहत सिग्नल या दरम्यान महामार्गालगत जागा अडवून कलिंगडाची दुकाने थाटण्यात आली आहेत. ती गेल्या अनेक वर्षांपासून त्याच जागेवर असून काही मंडळी त्याचे भाडे घेत आहेत. नेत्रज्योत रुग्णालय ते किबा हॉटेल या दरम्यान एका माफियाने स्थानिक असल्याचे भांडवल करून नर्सरी, गॅरेज त्याचबरोबर इतर कारणाकरिता जागा भाड्याने दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर मंदिराच्या नावावर मीटर घेवून सगळ्यांना वीज सुध्दा देण्यात आली आहे. तसेच सिडकोच्या पाइपलाइनला खाजगी पंप लावून पाणी सुध्दा चोरी केले जाते. जुने फर्निचर, याशिवाय इतर दुकाने थाटण्यात आल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. भिंगारी ते पळस्पे ओएनजीसी वसाहतीदरम्यान ही परिस्थिती असून महामार्गालगत कलिंगडापासून कृत्रिम फुले व इतर वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. एक तर या भागात महामार्ग अरुंद आहे आणि दुसरीकडे बाजूला अतिक्र मण करण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
पनवेल शहरालगतच्या अतिक्र मणाबाबत शिवसेनेचे पालिकेतील गटनेते रमेश गुडेकर यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळाकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र त्यांना आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. मात्र आता रस्ते विकास महामंडळाने या सर्व अतिक्रमणांना नोटिसा बजावल्या आहेत.