सुकापूरमध्ये चार इमारतींवर हातोडा
By Admin | Updated: October 28, 2015 23:35 IST2015-10-28T23:35:09+5:302015-10-28T23:35:09+5:30
तालुक्यातील अनिधकृत बांधकामांवर सिडकोने पुन्हा कारवाई सुरू केली आहे. सिडकोने बुधवारी सुकापूर येथील चार इमारती अनधिकृत ठरवत त्या इमारती बांधताना नैना प्रकल्पाची

सुकापूरमध्ये चार इमारतींवर हातोडा
पनवेल : तालुक्यातील अनिधकृत बांधकामांवर सिडकोने पुन्हा कारवाई सुरू केली आहे. सिडकोने बुधवारी सुकापूर येथील चार इमारती अनधिकृत ठरवत त्या इमारती बांधताना नैना प्रकल्पाची परवानगी न घेतल्याने जमीनदोस्त करण्यात आल्या.
पनवेल तालुक्यातील नैना क्षेत्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर सिडकोने आता लक्ष केंद्रित केले आहे. बांधकामांची यादी सध्या तयार करण्यात आली असून, बांधकामे तोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासनाने नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या पेण, पनवेल, खोपोली या तालुक्यांतील २७० नैना क्षेत्रात (नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र) सध्या अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. सिडकोने आरक्षण टाकण्यापूर्वी विकासकांनी मोकळ्या जागेत अनधिकृत टोलेजंग इमारती उभारण्यास सुरु वात केली आहे. अशा जवळपास ३०० हून अधिक बांधकामांना सिडकोने यापूर्वी नोटिसा दिलेल्या आहेत. त्याची विकासकांनी फारशी दखल घेतलेली नाही. सिडकोने पनवेल तालुक्यातील १० ते १२ बांधकामांवर आतापर्यंत कारवाई केली आहे. तरीही बांधकामांची संख्या वाढत असल्यामुळे नवीन अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्यात आली आहे. त्या बांधकामांवर हातोडा चालविण्यात येणार आहे.
सिडकोच्या अतिक्र मण विभागाने सुकापूर भगतवाडी येथील तीनमजली व दोनमजली अनधिकृत इमारतींवर कारवाई करीत इमारती जमीनदोस्त केल्या. सिडकोने वेळोवेळी नोटीस पाठवूनदेखील विकासकाने काम चालू ठेवले व कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे तालुक्यातील सिडकोने अनधिकृत बांधकामांची यादी जाहीर करीत पहिल्या टप्प्यातील कारवाईला सुरु वात केली आहे. यावेळी सिडकोचे अधिकारी व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नैना प्रकल्पाची परवानगी न घेता या इमारती बांधकाम व्यावसायिकांनी बांधल्या होत्या. अखेर सिडकोने दोन जेसीबीच्या
आणि चार पोकलेनच्या साह्याने इमारतींवर हातोडा फिरवून जमीनदोस्त केल्या.
अतिक्रमण विभागाचे सुभाष गोसावी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांच्यासह पोलीस, सिडकोचे सुरक्षारक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)