मसाला मार्केटमधील अतिक्रमणांवर हातोडा
By Admin | Updated: June 15, 2016 01:43 IST2016-06-15T01:43:45+5:302016-06-15T01:43:45+5:30
एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील अनधिकृत वाढीव बांधकामांवर अखेर महापालिकेने हातोडा घातला, तर कारवाई टाळण्यासाठी ज्या व्यापाऱ्यांनी गाळे बंद केले त्यांच्या गाळ्यांना सील ठोकण्यात

मसाला मार्केटमधील अतिक्रमणांवर हातोडा
नवी मुंबई : एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील अनधिकृत वाढीव बांधकामांवर अखेर महापालिकेने हातोडा घातला, तर कारवाई टाळण्यासाठी ज्या व्यापाऱ्यांनी गाळे बंद केले त्यांच्या गाळ्यांना सील ठोकण्यात आले आहे. एपीएमसी आवारात महापालिकेने केलेली ही पहिलीच कारवाई ठरली आहे. यावेळी कारवाईच्या विरोधात काही व्यापाऱ्यांनी गाळे बंद करून परिसरात तणाव निर्माण केला होता.
एपीएमसी मार्केट आवारात होत असलेल्या अनधिकृत वाढीव बांधकामांकडे अद्यापपर्यंत दुर्लक्ष केले जात होते. टपऱ्या, हॉटेल तसेच कार्यालये अनधिकृतपणे उभारण्यासह गाळ्यांमध्ये देखील विनापरवाना वाढीव बांधकामे करण्यात आलेली होती. मालाची साठवणूक करण्यासाठी व्यापाऱ्यांनी हे पोटमाळे बांधले होते. व्यावसायिक गाळ्यांची मूळ रचना बदलून केलेल्या या बांधकामांना महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. परंतु आजतागायत या अनधिकृत बांधकामांकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानेही पाठ फिरवली होती.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एपीएमसी आवाराचा आढावा घेतल्यानंतर त्याठिकाणच्या विनापरवाना वाढीव बांधकामांवर कारवाईच्या सूचना अतिक्रमण विरोधी पथकाला दिल्या होत्या. यानुसार तुर्भे विभाग कार्यालयामार्फत सुमारे शंभरहून अधिक व्यापाऱ्यांना महिन्याच्या मुदतीची नोटीस बजावण्यात आली होती. या मुदतीत व्यापाऱ्यांनी स्वत:हून वाढीव बांधकामे न हटवल्यामुळे मसाला मार्केटच्या डी गल्लीतील ३४ गाळ्यांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. यापूर्वी दोनदा त्याठिकाणची कारवाई टळली होती. १६ मे रोजी कारवाईदरम्यान व्यापाऱ्यांनी विरोध केल्यामुळे कारवाई थांबवली होती, तर २ जूनला पोलीस बंदोबस्ताअभावी कारवाई झाली नव्हती. अखेर मंगळवारी चोख पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. कारवाईच्या अनुषंगाने पोलिसांच्या उपस्थितीमुळे सकाळपासूनच मसाला मार्केटला छावणीचे रूप आले होते. दरम्यान, कारवाई टाळण्याकरिता काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून विरोध करण्याचाही प्रयत्न केला. परंतु एपीएमसी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे इतर व्यापाऱ्यांनी गाळे बंद करून कारवाईत अडथळा निर्माण केला. यामुळे ३२ गाळ्यांना सील ठोकल्याचे अतिक्रमण उपआयुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले. सील केलेल्या गाळ्यांमध्ये मर्र्चट चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणा यांच्याही गाळ्याचा समावेश आहे. तर दोन गाळेधारकांनी स्वत:हून पोटमाळे पाडायला सुरवात केली.
एपीएमसी मार्केटमध्ये महापालिकेने पहिल्याच दणक्यात ३४ गाळ्यांवर कारवाई केल्यामुळे अनधिकृत बांधकाम केलेल्या इतर व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार शहरात इतर ठिकाणी सुरू असलेल्या कारवाया पाहूनच मार्केटमधील बहुतांश व्यापाऱ्यांनी यापूर्वीच त्यांची अतिक्रमणे हटवलेली आहेत. परंतु मसाला मार्केटच्या डी गल्लीतील व्यापारी महापालिकेला एपीएमसीत कारवाईचा अधिकारच नसल्याच्या भ्रमात होते. मात्र प्रत्यक्षात महापालिकेचे पथक त्याठिकाणी धडकल्यानंतर याच व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना कारवाई टाळण्यासाठी आटापिटा करावा लागला. (प्रतिनिधी)
आणखी वृत्त/३
‘लोकमत’ने उठवला आवाज
एपीएमसीतील अतिक्रमणांविरोधात ‘लोकमत’ने अनेकदा आवाज उठवला आहे. मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या झुंडशाहीवरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला होता. मंगळवारी झालेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
व्यापाऱ्यांच्या गाळ्यांवर होत असलेल्या कारवायांमागे राजकीय कारण असल्याचा आरोप नवी मुंबई मर्चंट चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणा यांनी केला आहे. माथाडी कामगारांच्या सोयीसाठी व्यापाऱ्यांनी पोटमाळे तयार करून त्याठिकाणी मालाची साठवण केली जात आहे. तसेच मार्केटच्या एफएसआयचा प्रश्न न्यायालयीन स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कायद्याची तरतूद करून पोटमाळ्याचे बांधकाम नियमित करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंबंधी पालिका आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.