दिघ्यात बांधकामांवर हातोडा
By Admin | Updated: September 30, 2015 00:19 IST2015-09-30T00:19:44+5:302015-09-30T00:19:44+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीने दिघ्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईच्या पाहिल्या टप्प्यात बांधकाम सुरू असलेल्या

दिघ्यात बांधकामांवर हातोडा
नवी मुंबई: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीने दिघ्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईच्या पाहिल्या टप्प्यात बांधकाम सुरू असलेल्या दोन इमारती मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आल्या. उद्यापासून ही कारवाई मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. त्यामुळे या परिसरातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
दिघा परिसरातील ९९ इमारतींवर कारवाई करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीने मंगळवारपासून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कारवाईच्या पहिल्या दिवशी दिघा गावातील दोन इमारतींवर बुलडोझर फिरविण्यात आला. या दोन्ही इमारतींचे काम सुरू होते. पहिल्या टप्प्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर न्यायालयाने निर्देशित केलेल्या इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. आरटीआय कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची दखल घेत दिघा परिसरातील ९९ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीने मंगळवारपासून कारवाई सुरू केली. विशेष म्हणजे महापालिका व सिडको यांची मदत न घेता एमआयडीसीने स्वबळावर कारवाई केली. दरम्यान, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांचा विरोध लक्षात घेवून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.