पनवेलमध्ये गुटखा विक्री करणारांवर धाडी; चार जणांवर गुन्हा दाखल, १३ हजार रुपयांचा गुटखा जप्त
By नामदेव मोरे | Updated: September 21, 2022 18:26 IST2022-09-21T18:26:09+5:302022-09-21T18:26:28+5:30
नवी मुंबई, पनवेल परिसरात खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे.

पनवेलमध्ये गुटखा विक्री करणारांवर धाडी; चार जणांवर गुन्हा दाखल, १३ हजार रुपयांचा गुटखा जप्त
नवी मुंबई : पनवेल परिसरात गुटखा विक्री करणारांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. चार पानटपरी चालकांवर धाडी टाकून १३५६५ रुपयांचा गुटखा जप्त केला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबई, पनवेल परिसरात खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. प्रत्येक पानटपरी चालकाने गुटखा बंदीचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली असून याविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गुटखा विक्री करणारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे.
पेण विभागाचे सहायक आयुक्त देवानंद वीर यांनी सोमवारी पथकासह कळंबोली विभागात धाडी टाकल्या आहेत. दुपारी १ वाजता सेक्टर १ मधील वरूण बारजवळील पानस्टॉलमधून १२३० रुपयांचा वीमल पानमसाला जप्त केला. दोन वाजता करवली चौकातील स्टॉलमधूनही राजश्री पान मसाला, वीमल इतर गुटख्याचे पदार्थ जप्त केले.
तीन वाजता भाजी मार्केटमधील पानस्टॉलमधून याच परिसरातील अनंतलाल गुप्ताच्या स्टाॅलमधूनही गुटखा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने १३ हजार ५६५ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी पाटस्टॉल चालविणारे अरविंद कुमार अदवयप्रसाद दुबेय, बल्लू राजबहादूर चैरसिया, राजेंद्र विठ्ठल चव्हाण व अनंतलाल श्रीरामफेर गुप्ता या चार जणांविरोधात कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पनवेल परिसरात गुटखा विरोधातील कारवाई नियमीत सुरू ठेवली जाणार आहे.