पावसाने बहरल्या रोपवाटिका
By Admin | Updated: June 22, 2016 02:09 IST2016-06-22T02:09:41+5:302016-06-22T02:09:41+5:30
वर्षा ऋतूचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाल्याची झलक दोन दिवस पडलेल्या मृगाच्या सरींमुळे दिसून आली. ज्या ठिकाणी भातपेरणी झाली तेथे पावसामुळे भाताच्या नर्सरी रोपांनी आपले अस्तित्व दाखवित

पावसाने बहरल्या रोपवाटिका
पेण : वर्षा ऋतूचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाल्याची झलक दोन दिवस पडलेल्या मृगाच्या सरींमुळे दिसून आली. ज्या ठिकाणी भातपेरणी झाली तेथे पावसामुळे भाताच्या नर्सरी रोपांनी आपले अस्तित्व दाखवित बळीराजाला आनंदाची वार्ता दिली. यामुळे सगळीकडे भात रोपांचे हिरवे गालिचे पसरल्याचे दिसून येत आहेत. पेणच्या १३ लाख १०० हेक्टर लागवडी क्षेत्रावरील ५० टक्के रोपवाटिकांनी आपले अस्तित्व दाखवले आहे. पुढच्या नक्षत्रांच्या रेलचेलीने सबंध शिवारात हिरवा गालिचा पसरुन पीक डोलू लागणार आहे. रायगडमधील एक लाख बारा हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती लागवड होणार आहे.
पेणच्या शिवारात सुपीक लालबुंद मातीत भाताची नर्सरी रोपे आता शेतकऱ्यांसह सर्वांनाच खुणावत आहेत. तब्बल २० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मृगाच्या अंतिम टप्प्यात मान्सून राज्यभरात दाखल झाला. हवामानशास्त्र विभागाचे सर्व अंदाज फोल ठरवत थाटात मान्सूनची एण्ट्री झाली. परंतु जीव टांगणीला लागलेला बळीराजा मात्र चिंतातुर होता. मृगाची पाऊसधारा कधी एकदा पडते या प्रतीक्षेची अखेर होऊन पाऊस मनसोक्त पडला. धरणी ओलीचिंब झाली, अंकुरलेले दाणे या पावसाने अलगद वर आले. यासाठी पौर्णिमेच्या उधाणभरतीची वाट पहावी लागली. गतवर्षी पाऊस न पडल्याने तप्त झालेल्या धरणीला सुध्दा चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करावी लागते. शेवटी सृजनसृष्टीच्या नवचैतन्याचे मधुर मिलनातून नवी पहाट व उन्नती होते. भाताचे अमाप कोठार असलेल्या रायगड जिल्ह्याच्या शिवारात पावसाच्या पाण्यावरची शेती आता टिकणार; शेतामध्ये भाताचे मातीपासून तयार केलेले वाफे त्यात हिरव्या तृणांकुरांनी जन्म घेतल्याने या गोंडस व मनमोहक हिरव्या पुंजवयानी आता वाटसरुंचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. पेणच्या मुंबई - गोवा महामार्गालगतची शेती व पेण - खोपोली राज्य मार्गालगतच्या शेतात या हिरव्या - हिरव्या गालिच्यांचे सुरेख रंग प्रत्येकाचे मन आकर्षित करते. थोड्या अवधीत या शेतामध्ये सुगीची रेलचेल दिसणार आहे, अन् खरीप हंगामातील श्रमिकांची महिनाभर लावणीची कामे चालणार आहे. (वार्ताहर)