दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज
By Admin | Updated: September 5, 2015 23:19 IST2015-09-05T23:19:10+5:302015-09-05T23:19:10+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने मंडळांना रोडवर दहिहंडी साजरी करण्यास परवानगी नाकारली आहे. यामुळे बहुतांश मंडळांनी मैदानामध्ये उत्सव साजरा करण्याची

दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज
नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने मंडळांना रोडवर दहिहंडी साजरी करण्यास परवानगी नाकारली आहे. यामुळे बहुतांश मंडळांनी मैदानामध्ये उत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे. मैदान उपलब्ध झाले नाही त्यांनी उत्सवच रद्द केला आहे. अनेकांनी दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर केली आहे.
मुंबई, ठाणे प्रमाणे मागील काही वर्षांपासून नवी मुंबईमध्येही भव्य स्वरूपात दहिहंडी उत्सव साजरा केला जावू लागला आहे. बहुतांश राजकिय नेते व कार्यकर्ते दहिहंडीचे आयोजन करत असून १ लाखापासून ११ लाख रूपयांपर्यंत बक्षीसांचे वाटप करू लागले आहेत. लाखो रूपयांच्या बंक्षीसांमुळे अनेक नामवंत गोविंदा पथके याठिकाणी हंडी फोडण्यासाठी येवू लागले होते. परंतू यंदा सर्वोच्च न्यायालयाने रोडवर उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे. यामुळे आयत्यावेळी मंडळांना मैदानांचा शोध सुरू करावा लागला. कोपरखैरणेमधील वैभव नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह अनेक नेत्यांच्या मंडळांनी मैदानामध्ये भव्य स्वरूपात उत्सवाचे आयोजन केले आहे.
नेरूळमधील जनकल्याण मित्र मंडळाने नवी मुंबईमध्ये दहिहंडी उत्सवास लोकप्रियता मिळवून दिली होती. नगरसेवक रविंद्र इथापे यांनी पहिल्यांदा बक्षीसांची रक्कम एक लाख पेक्षा जास्त देण्याची प्रथा सुरू केली. परंतू यंदा दहिहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील बड्या नेत्यांना मैदाने उपलब्ध झाली आहेत. परंतू सामान्य कार्यकर्त्यांना मैदाने मिळाली नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्यांदाच मैदानामध्ये उत्सव होत असल्यामुळे वाहतूकिची कोंडी होणार नाही. मैदानामध्ये गोविंदा पथकांनाही हंडी फोडण्यासाठी सुरक्षीत वाटत आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांचा कडक बंदोबस्त : गोविंदा उत्सव शांततेमध्ये पार पाडण्यासाठी शहरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. मंडळांना विश्वासात घेवून सूचना दिल्या आहेत. गोविंदाच्या सुरक्षेसाठी पुरेशी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उत्सव शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याची प्रतिक्रिया परिमंडळ एकचे उपआयुक्त शहाजी उमाप व वाहतूक पोलिस उपआयुक्त अरविंद साळवी यांनी दिली आहे.
तुर्भे इंदिरानगरमध्ये शिवसेनेच्यावतीने प्रत्येक वर्षी भव्य दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी राज्यात भिषण दुष्काळ असल्यामुळे उत्सव रद्द करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रूपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक रामाशेठ वाघमारे व शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी दिली. जनकल्याण मित्र मंडळानेही उत्सव रद्द केला आहे. दुष्काळग्रस्तांसाठी दिड लाख रूपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती नगरसेवक रविंद्र इथापे यांनी दिली. इतरही अनेक मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली आहे.
कार्यकर्त्यांची नाराजी
शहरातील अनेक गोविंदा उत्सव मंडळांना मैदान उपलब्ध झाले नाही. यामुळे अनेकांना उत्सव रद्द करावा लागला. रोडवर परवानगी मागीतलेल्या मंडळांना पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे आयोजकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मोठ्या नेत्यांच्या मंडळांना मैदाने मिळाली असून सामान्य कार्यकर्त्यांवर मात्र उत्सव रद्द करण्याची वेळ आली. यामध्ये शिवसेना, भाजपा पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. युतीची सत्ता असतानाच गोविंदा उत्सव साजरा करता न आल्यामुळे कार्यकर्त्यांनी खाजगीत नाराजी व्यक्त केली. युतीपेक्षा आघाडीसरकार परवडले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.