शासकीय अध्यापक महाविद्यालयाला गवताचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:32 IST2020-12-17T23:32:25+5:302020-12-17T23:32:29+5:30

प्राण्यांमुळे भीती वाढली

Government Teachers College surrounded by grass | शासकीय अध्यापक महाविद्यालयाला गवताचा वेढा

शासकीय अध्यापक महाविद्यालयाला गवताचा वेढा

कळंबोली : पनवेल बस स्थानकाजवळील शासकीय अध्यापक महाविद्यालय परिसरात गवताचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बाजूला असलेल्या शिवाजीनगर झोपडपट्टीसह परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पनवेल बस स्थानकाजवळ असलेल्या अध्यापक महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. तर संरक्षण भिंतींवर वेलींनी कब्जा केला आहे. कोरोना काळात शासकीय अध्यापक महाविद्यालय बंद असल्याने परिसराच्या साफसफाईकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे गवताचे प्रमाण वाढले आहे. अध्यापक विद्यालय फलकसुद्धा वेलीने वेढलेला आहे. त्यामुळे बाजूच्या परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. दिवसभर उन्हाच्या गर्मीमुळे साप रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. विंचू त्याचबरोबर इतर दंश करणारे प्राणी परिसरात वावरताना दिसत आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनासुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गवत वाढल्याने झोपडीधारक या गवतात कचरा टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. त्याचबरोबर रस्त्यावरून चालताना नागरिकांना नाक मुठीत धरावे लागत आहे. परिसरात लाईटची व्यवस्था नसल्याने रात्री रहिवाशांना त्रास होत आहे. त्याकरिता अध्यापक विद्यालयातील परिसराची साफसफाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

संरक्षण भिंतीवरील तारा तुटलेल्या अवस्थेत
महाविद्यालयास संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. त्यावरील तारेचे कुंपण तुटलेल्या अवस्थेत असल्याने कुत्र्यांचे वास्तव्य वाढले आहे. तर कचरा भिंतीवरून गवतात फेकला जात आहे. रात्री लाईटची व्यवस्था नसल्याने सरपटणारे प्राणी दिसून येत नाहीत.

Web Title: Government Teachers College surrounded by grass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.