मुंबईहून नवी मुंबई विमानतळाला जाणे होणार खर्चीक! ५०० रु. लागतील टोलला, २५ किलोमीटर प्रवासाचा इंधनखर्च वेगळा
By अतुल कुलकर्णी | Updated: December 16, 2025 08:47 IST2025-12-16T08:46:42+5:302025-12-16T08:47:36+5:30
ओला-उबेरने गेलात तर हजार-पंधराशेचा खर्च पक्का

मुंबईहून नवी मुंबई विमानतळाला जाणे होणार खर्चीक! ५०० रु. लागतील टोलला, २५ किलोमीटर प्रवासाचा इंधनखर्च वेगळा
'एनएमआयए'चे फायदे/अपेक्षा : भाग-२
अतुल कुलकर्णी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: नवी मुंबईचे अत्यंत सुंदर विमानतळ प्रत्येकाला आकर्षित करणारे आहे. या विमानतळावरून प्रवास करण्याची इच्छा असली तरी मुंबईतल्या लोकांना नवी मुंबई विमानतळ गाठणे अत्यंत जिकिरीचे होणार आहे. मुंबईतून या विमानतळाला जाण्यासाठी अटल सेतूचा एक पर्याय आहे. मात्र, त्यासाठी पाचशे रुपये टोलचे द्यावे लागतील. शिवाय २५ किलोमीटरचा प्रवास आणि लागणाऱ्या पेट्रोल, डिझेलचा खर्च कळीचा मुद्दा ठरेल. ओला, उबरने विमानतळ गाठायचे तर येणारा खर्च किमान हजार रुपयांच्या पुढे असेल.
नवी मुंबईला विमानतळ होणार हे निश्चित झाले, तेव्हापासूनच नवी मुंबईतून ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या मेट्रोचे काम सुरू झाले असते तर एवढ्या वर्षांत मेट्रो पूर्ण झाली असती. परिणामी, नवी मुंबई विमानतळ अगदी हाकेच्या अंतरावर आले असते. मात्र, तसे झाले नाही. अटल सेतूला शिवडी, वडाळा येथून कनेक्टर देण्यात आले आहेत. मात्र, वरळी सी-लिंक ते अटल सेतू जोडण्यासाठीचे काम पूर्ण व्हायला सप्टेंबर २०२६ उजाडेल. मेट्रो नवी मुंबई विमानतळापर्यंत नेण्यासाठी किती काळ लागेल हे स्पष्ट नाही. तोपर्यंत मुंबईच्या प्रवाशांना नवी मुंबईतून विमान घेणे अडचणीचे होऊ शकते.
नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी कुठून जायचे असेल तर साधारण किती खर्च येऊ शकतो त्याचा हा अंदाज आहे.
ठिकाण अंतर (किमी) टॅक्सी भाडे
दहिसर ५४-५५ १२००-१६००
बोरिवली ५०-५३ ११००-१५००
गोरेगाव ४२-४५ ९००-१२००
अंधेरी ३२-३५ ८००-११००
बांद्रा ३३-३६ ७५०-१०००
दादर ३४-३८ ९००-१२००
महालक्ष्मी ३६-३९ १०५०-१३००
मलबार हील ४३-४६ १२००-१६००
चर्चगेट ३८-४० ९५०-१३००
कुलाबा ४०-४२ १०५०-१४००
लंडन, हैदराबाद, बेंगलोर या ठिकाणी अशीच शहराबाहेर विमानतळे उभारण्यात आली. तेथेदेखील पोहोचण्यासाठी किमान दोन तास लागतात, असे सांगण्यात येते. मात्र, हा इतिहास लक्षात घेऊनही नवी मुंबई विमानतळाला जोडण्यासाठी वेळीच हालचाली केल्या नाहीत हे वास्तव आहे.
एक विमान सुरू करण्यासाठी ग्राउंड स्टाफ ते कॅप्टनपर्यंत किमान १०० ते १२५ लोक कामासाठी लागतात. टी वन, टी द्व, सहार कार्गो, सांताक्रूझ कार्यों, कलिना गेट नं. ८ या पाच ठिकाणी मिळून अंदाजे १५ ते १८ हजार लोक काम करतात, नवी मुंबई विमानतळावरून वाहतूक जसजशी वाढू लागेल, तसतशी तिथे काम करणाऱ्यांची गरजही वाढेल. परिणामी, तिथे राहण्यासाठी घरे, शाळा, वैद्यकीय सुविधांची गरज निर्माण होईल.
सध्या नवी मुंबई विमानतळाबाहेर पडल्यानंतर पाम बीच रोडपर्यंत चांगले हॉटेल नाही. जी आहेत ती पुरेशी नाहीत. पाम बीच रोड ते एअरपोर्ट एकही सुलभशौचालयसुद्धा नाही. अशा स्थितीत देखणे विमानतळ गाठण्यासाठी सहन करावा लागणारा त्रास मोठा ठरेल.
इस्रायलमध्ये विमानतळ ते शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणांसाठी मोफत लक्झरी बस सेवा आहे. या बस शहरातल्या वेगवेगळ्या भागातील प्रवाशांना विमानतळावर नेण्याचे आणि सोडण्याचे काम मोफत करतात. बेंगलोर, हैदराबाद येथे सुपर एसी बस आहेत. त्या नाममात्र दरात तुमच्या सामानासह तुम्हाला शहरातल्या कोणत्याही ठिकाणाहून विमानतळावर नेण्या-आणण्याचे काम करतात.
हाँगकाँग येथे मेट्रो स्टेशन्स विमानतळाला जोडलेले आहे. सहा तास आधी जर तुम्ही कोणत्याही मेट्रो स्टेशनवर तुमचे सामान दिले तर ते तुमच्या विमानात पोहोचविले जाते. त्यानंतर तुम्ही विनासामान शहरात फिरू शकता. खरेदी करू शकता. जवळ सामान असेल तर लोक ओझे घेऊन कुठे फिरायचे म्हणून फिरायचे टाळतात. त्यावर काढलेला हा उपाय अतिशय चांगला आहे. शिवाय यामुळे परदेशी प्रवाशांकडून परकीय चलनही मिळते ते वेगळेच. आपल्याकडे गेटवे ऑफ इंडिया, चर्चगेट, वरळी सी-लिंक, दादर असा समुद्रकिनारा आहे. विमान प्रवाशांना समुद्र मार्गाने नवी मुंबई विमानतळावर नेण्याची कोणतीही चर्चा सध्यातरी नाही.