गोव्यातील जांभळांची मुंबईवारी
By Admin | Updated: April 23, 2017 02:21 IST2017-04-23T02:21:37+5:302017-04-23T02:21:37+5:30
जांभळाचा मोसम सुरू झाल्याने आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज एक टन जांभूळ विक्रीसाठी येऊ लागले आहेत. गोव्यातून जांभळाची मोठ्या

गोव्यातील जांभळांची मुंबईवारी
- नामदेव मोरे, नवी मुंबई
जांभळाचा मोसम सुरू झाल्याने आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज एक टन जांभूळ विक्रीसाठी येऊ लागले आहेत. गोव्यातून जांभळाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. घाऊक बाजारात ६० ते ८० व किरकोळ बाजारात १०० ते १२५ रुपये किलो दराने जांभूळ विकले जात आहे.
महाराष्ट्रात दुर्लक्षित असलेल्या व गांभीर्याने शेती म्हणून लक्ष न दिलेल्या फळांमध्ये जांभळाचा सहभाग होतो. एप्रिल ते जूनदरम्यान राज्यातील छोट्या शहरांमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी जांभूळ विक्रीसाठी घेऊन येतात. पाच ते दहा रुपयांना एक पेला या दरानेच त्याची विक्री होते. परंतु, आता या फळामधील औषधी गुणांविषयी जागृती होऊ लागल्याने मुंबई व इतर महानगरांमध्ये जांभळाची मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्य:स्थितीत रोज किमान एक टन माल गोव्याहून विक्रीसाठी येत आहे. याशिवाय मुंबईमध्ये भायखळा व इतर ठिकाणी थेट विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात जांभूळ जात आहेत. १५ दिवसांनंतर बदलापूर, नाशिक, सांगली, सातारा व कोकणातूनही जांभूळ मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. एपीएमसीमध्ये मोठ्या आकाराची जांभळे ८० रुपये व लहान आकाराची ६० व ७० रुपये किलोलो विकली जात आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हे दर १०० ते १२५ रुपये किलो आहेत. मधुमेहावर ते गुणकारी आहे. हा आजार झालेले जांभूळ खातातच, शिवाय त्याच्या बिया सुकवून त्याची भुकटी करून वर्षभर तिचे प्राशन करत असतात. याशिवाय अनेक आजारांवर ते उपयोगी असल्यानेही मागणी वाढत आहे. (प्रतिनिधी)
आरोग्यदायी जांभळे : जांभळाच्या बियांची पावडर मधुमेहावर गुणकारी आहे. जांभळाचा गर व रस रक्तक्षय, हिमोग्लोबीन, अरुची, भूकवर्धक, त्वचारोग व इतर आजारांसाठी उपयोगी आहे. तसेच उच्च रक्तदाब, यकृताशी संबंधित आजारावरही जांभूळ गुणकारी आहे.
मुंबई बाजार समितीमध्ये सद्य:स्थितीत रोज सरासरी एक टन जांभूळ विक्रीसाठी येत आहेत. ६० ते ८० रुपये किलो दराने होलसेलमध्ये विक्री होत असून बहुतांश माल गोवा येथून येत आहे. पुढील १५ दिवसांमध्ये बदलापूर, नाशिक, सांगली व इतर ठिकाणावरून जांभूळ विक्रीसाठी येईल. - संजय पानसरे, व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसी