मुंबई : वैद्यकीय शास्त्रात गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले आहेत. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधनांमुळे काही प्रमाणात उपचारांचा खर्चदेखील वाढला आहे. रुग्णाला उत्तम उपचार द्यायचे असल्यास नवीन तंत्रज्ञानाचा, औषधांचा वापर केलाच पाहिजे. पण म्हणून गोरगरिबांना औषधाविना ठेवणे योग्य नाही. चांगले आरोग्य हा त्यांचादेखील अधिकार आहे. यासाठीच गोरगरिबांना उत्तम आरोग्यसेवा देणे, हेच आयुर्विद्या प्रसारक मंडळाचे ध्येय आहे. रुग्णालयात आवश्यक ते बदल करणे, तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मत 'लोकमत व्यासपीठ'वर आलेल्या आयुर्विद्या प्रसारक मंडळाच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केले.'लोकमत व्यासपीठ'वर शीव येथील आयुर्विद्या प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष वैद्य शाम नाबर, सहसरकार्यवाह डॉ. विश्वजित पाताडे, नियामक मंडळ सदस्य डॉ. सुजाता पाताडे, माजी विद्यार्थी डॉ. तेजस लोखंडे उपस्थित होते. मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय आणि शेठ रणछोडदास वरजीवनदास आयुर्वेदीय रुग्णालय गेली ६0 वर्षे गरीब रुग्णांसाठी कार्यरत आहे. शीव येथे रुग्णालय असल्यामुळे धारावी परिसरातील अनेक व्यक्ती उपचारासाठी येथे येत असतात. या सर्व रुग्णांना रास्त दरात उपचार दिले जातात. रुग्णालयात आयुर्वेदिक उपचारांच्या बरोबरीनेच प्रसूती, डोळ्य़ांच्या आणि इतर काही सामान्य शस्त्रक्रिया केल्या जातात. या रुग्णालयात जनरल आणि डोळ्य़ांसाठी अशी दोन ऑपरेशन थिएटर आहेत. याचबरोबरीने पॅथॉलॉजी लॅब, ईसीजीची सुविधा असून पंचकर्म, स्वेदन, वमन असे उपचारही केले जातात, असे वैद्य नाबर यांनी सांगितले.१९४८ साली आयुर्विद्या प्रसारक मंडळाची नोंदणी करण्यात आली. यानंतर १९५४ साली आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना झाली. त्याआधी आयुर्वेद रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग हा गिरगाव येथील मुगभाटमध्ये कार्यरत होता. शीव येथे मंडळाला जागा मिळाल्यानंतर महाविद्यालय आणि रुग्णालयाची सुरुवात आता ज्या ठिकाणी रुग्णालय आहे तिथे करण्यात आली. सध्या या रुग्णालयामध्ये १४ विभाग कार्यरत आहेत. या रुग्णालयामध्ये दररोज २00 रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येतात. या रुग्णांना अत्यंत अल्प दरात उपचार दिले जातात. या रुग्णालयात सध्या ९0 ते १00 रुग्णांना दाखल करून घेतले जाते. अत्यल्प दरात त्यांना नाश्ता, जेवण, चहा, औषधे आणि आयुर्वेदिक उपचार दिले जातात, असे वैद्य नाबर यांनी सांगितले. पंचकर्म आणि स्पामधील फरक स्पष्ट करताना डॉ. विश्वजित पाताडे यांनी असे सांगितले की, सध्या स्पा सेंटरमध्ये जाऊन उपचार करून घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळेच अनेकदा रुग्ण स्वत:च आम्हाला विरेचन करायचे आहे, बस्ती करायची आहे, असे सांगतात. हे योग्य नाही. पंचकर्म ही आयुर्वेदातील एक उपचार पद्धती आहे. यामुळे त्या व्यक्तीची तपासणी करूनच कोणते कर्म करायचे, हे ठरवण्यात येते. आमच्या रुग्णालयात करण्यात येणारे पंचकर्म हे आयुर्वेदाच्या तत्त्वांवर आधारित आहे. यामुळेच तपासणी केली जाते. स्पामध्ये गेल्यावर रिलॅक्स वाटते. त्यामुळे पंचकर्म केल्यावर आराम मिळेल म्हणून अयोग्य पद्धतीने, अयोग्य वेळी करून घेतल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. पुढच्या काळात रुग्णालयाची क्षमता वाढवण्याचा मंडळाचा मानस असल्याचे तसेच येथे मोठय़ा प्रमाणात औषधांची निर्मिती करण्याचा मानस असल्याचे वैद्य नाबर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गोरगरिबांना आरोग्यसेवा देणे हेच ध्येय
By admin | Updated: March 16, 2015 07:42 IST