जीवन विद्या मिशनचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2016 02:36 IST2016-02-21T02:36:34+5:302016-02-21T02:36:34+5:30
नगरपालिका आणि ‘लोकमत’ यांच्या वतीने जीवन विद्या मिशन परिवाराचा गौरव सन्मान रविवारी करण्यात येणार आहे. पनवेल येथील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर

जीवन विद्या मिशनचा गौरव
पनवेल : नगरपालिका आणि ‘लोकमत’ यांच्या वतीने जीवन विद्या मिशन परिवाराचा गौरव सन्मान रविवारी करण्यात येणार आहे. पनवेल येथील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर रविवारी सायंकाळी ६ वाजता ‘लोकमत’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पनवेल, रायगड, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्या मिशन परिवारातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.
समाजप्रबोधनाच्या या कार्याला एकूण ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. सद्गुरू वामनराव पै यांच्या महानिर्वाणानंतर प्रल्हाद पै यांनी जीवन विद्या मिशनच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजप्रबोधनाचे काम सुरू आहेच, त्याचबरोबर कर्जत येथे जीवन विद्या ज्ञानपीठ आणि कामोठे वसाहतीत जीवन विद्या ज्ञानसाधना केंद्र उभारण्यात आले आहे.
गर्भसंस्कार, विद्यार्थी कोर्स, कौटुंबिक सौख्य, स्वानंदयोग यासारखे सत्कार्य प्रल्हाद पै यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तरुणांकरिता उत्कर्ष एक प्रवास हे अभियान आयोजित करण्यात आले आहे.
बिझनेस मॅनेजमेंटमध्ये यशस्वी होण्याकरिता माइंड मॅनेजमेंट ही संकल्पना प्रल्हाद पै यांनी मांडली. या कार्याबद्दल त्यांना सावली फाउंडेशन मुंबईच्या वतीने सावली शांतीरत्न पुरस्कार तसेच धृवतारे सन्मान अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पनवेल नगरपालिका
आणि ‘लोकमत’च्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा चारुशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे, अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित, विरोधी पक्षनेते संदीप पाटील, गटनेते अनिल भगत, बांधकाम सभापती राजू सोनी, महिला व बालकल्याण सभापती सीताताई पाटील, शिवसेनेचे पक्षप्रतोद रमेश गुडेकर, नगरसेवक शिवदास कांबळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रल्हाद पै उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)