विशेष मुलांना प्रवेश द्या
By Admin | Updated: May 6, 2015 00:41 IST2015-05-06T00:33:37+5:302015-05-06T00:41:23+5:30
वाशीमधील नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण, सेवा-सुविधा केंद्राच्या वतीने शहरातील विशेष मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात.

विशेष मुलांना प्रवेश द्या
प्राची सोनवणे, नवी मुंबई
वाशीमधील नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण, सेवा-सुविधा केंद्राच्या वतीने शहरातील विशेष मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. या केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी हजारो मुले प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वच पालिका शाळा, तसेच खाजगी शाळांनी आपल्या शाळेत या मुलांना प्रवेश देऊन सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन केंद्राच्या संचालिका वर्षा भगत यांनी केले आहे.
ईटीसी केंद्रात सध्या ४७७ मुले प्रशिक्षण घेत आहेत. अपंग प्रवर्गातील १२०० हून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या प्रवेश मर्यादेच्या अधीन राहूनच केंद्रामार्फत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे सर्वच मुलांना प्रवेश देणे शक्य होत नाही. या केंद्रात बहुअपंगत्व आणि मतिमंद विभागातील मुलांची संख्या जास्त आहे. नवी मुंबई परिसरातील शाळांमध्ये किमान एका तरी विशेष मुलाला प्रवेश मिळावा यासाठी केंद्राच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. ईटीसी केंद्रात आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी प्रवेशासाठी पालकांची रांग लागते. आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा हीच प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे तसेच महापौर सागर नाईक यांनी या केंद्रासाठी वेळोवेळी सहकार्य केले आहे. विशेष मुलांना जवळपासच्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी केंद्राच्या वतीने पालकांना तसेच शाळेला पुरेपूर सहकार्य केले जाते. शाळेतील शिक्षकांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची सोय या केंद्रामार्फत केली जाते. तसेच पालकांसाठीही विविध उपक्रम राबविले जातात. १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी खास प्रशिक्षणाची सोय केलेली आहे. या उपक्रमांतर्गत सध्या १२ मुले प्रशिक्षण घेत आहेत. पालक आणि मुलांना एकत्रितपणे प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून त्यानंतर घरच्या घरी देखील मुलांचा विकास होऊ शकतो. यामध्ये फिजियोथेरेपीचा समावेश असतो. तसेच वाचा, श्रवण, बौद्धिक क्षमता, शैक्षणिक पातळी, व्यवसाय उपयोगी प्रशिक्षण देऊन कमीत कमी कालावधीत मुलांचा जास्तीत जास्त विकास केला जातो.
खाजगी संस्थांच्या वतीने अशा विशेष मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी एका सेशन्समागे २७५ ते ३०० रुपयांचा दर आकारला जातो. ईटीसी केंद्रात तज्ज्ञांच्या मदतीने मोफत प्रशिक्षण देण्यात येते.