विकास आराखडा दोन महिन्यांत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2016 02:29 IST2016-05-27T02:29:29+5:302016-05-27T02:29:29+5:30
महापालिकेची स्थापना होवून २४ वर्षे झाल्यानंतरही अद्याप शहराचा विकास आराखडा तयार झालेला नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही रखडलेल्या आराखड्याविषयी नाराजी व्यक्त केली
विकास आराखडा दोन महिन्यांत द्या
नवी मुंबई : महापालिकेची स्थापना होवून २४ वर्षे झाल्यानंतरही अद्याप शहराचा विकास आराखडा तयार झालेला नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही रखडलेल्या आराखड्याविषयी नाराजी व्यक्त केली असून, दोन महिन्यांत आराखडा सादर करा, असे आदेश दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
नवी मुंबईचा विकास आराखडा तयार करण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. सर्वप्रथम १९९७ मध्ये आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला. परंतु तेव्हापासून अद्याप आराखडा तयार झालेला नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विभागाची माहिती घेत असताना ही गोष्ट निदर्शनास आली. आराखडा तयार करण्याची जबाबदारी नगररचना विभागाचे सहायक संचालक सुनील हजारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हजारे मे २०१५ मध्ये प्रतिनियुक्तीवर आले आहेत. पालिकेत आल्यापासून विकास आराखडा तयार करण्याचे काम बाजूला ठेवून बांधकाम परवानगी व बांधकाम पूर्ण झाल्याची परवानगी देण्याच्या कामावरच जास्त लक्ष दिले आहे. आयुक्तांनी याविषयी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. पालिकेचा आराखडा लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचना त्यांनी या विभागाला दिल्या आहेत. दोन महिन्यांची मुदत यासाठी दिली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.
नगररचना विभागाचे सहायक संचालक सुनील हजारे यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील दीड एफएसआयअंतर्गत बांधकाम परवानगीसाठी दाखल केलेले काही प्रस्ताव अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. याशिवाय मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचे अनेक प्रस्ताव मंजुरीसाठी पाच ते सहा महिन्यांपूर्वी पाठविले आहेत. परंतु अद्याप त्या प्रस्तावांना मंजुरी दिलेली नाही. बांधकाम परवानगी ६० दिवसांमध्ये देणे आवश्यक असताना सहा महिने परवानगीच्या फाईल धूळ खात पडल्याने विकासकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.