पनवेलमध्ये सरकारी जागेत गर्दुल्ल्यांचे अड्डे
By Admin | Updated: March 10, 2016 02:28 IST2016-03-10T02:28:22+5:302016-03-10T02:28:22+5:30
पनवेलमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या इमारतींचा ताबा गर्दुल्ल्यांनी घेतला आहे. अर्धवट पडलेल्या इमारतींमध्ये जुगार अड्डे सुरू आहेत.

पनवेलमध्ये सरकारी जागेत गर्दुल्ल्यांचे अड्डे
नामदेव मोरे, नवी मुंबई
पनवेलमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या इमारतींचा ताबा गर्दुल्ल्यांनी घेतला आहे. अर्धवट पडलेल्या इमारतींमध्ये जुगार अड्डे सुरू आहेत. मद्यपान व अमलीपदार्थांच्या पार्ट्या केल्या जात आहेत. नशेसाठी अमलीपदार्थ न मिळाल्यास स्पेप ७, कफ सीरप व इतर औषधांचा वापर होत आहे. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्वच शासकीय यंत्रणा मूग गिळून गप्प बसल्या आहेत.
शहरातील बंदर रोड परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. पूर्वी प्रशासकीय कार्यालयाबरोबर येथे काम करणाऱ्या कामगार व अधिकाऱ्यांची निवासस्थाने याच परिसरात उभारण्यात आली होती. परंतु १० ते १२ वर्षांपूर्वी या इमारती धोकादायक झाल्याने त्यांचा वापर थांबविण्यात आला. जुन्या इमारतींचे खंडरात रूपांतर झाले आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींचा ताबा गर्दुल्ले, मद्यपी व जुगाऱ्यांनी घेतला आहे. बिनधास्तपणे या ठिकाणी जुगार सुरू असतो. जुगारासाठीच्या पत्त्यांचा ढीग सर्व खोल्यांमध्ये पाहावयास मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय बंद झाले, की या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या वाढते. येथील खोल्यांमध्ये बसून चरस, गांजा व इतर अमलीपदार्थांचे सेवन केले जात आहे. अमलीपदार्थ सापडले नाहीत तर कारपेट व इतर गोष्टी चिपकविण्यासाठी वापरण्यात येणारे स्पेब ७, कफ सीरप, व्हाइटनर व इतर वस्तूंचा नशेसाठी वापर केला जात आहे. स्पेब ७ च्या डब्यांचा ढीग सर्वत्र पाहावयास मिळत आहे. त्याच्या उग्र दर्पामुळे अमलीपदार्थांच्या सेवनासाठी त्याचा वापर होत आहे.
या ठिकाणी दिवसा व रात्रीही कोणीच फिरकत नसल्याने दारू पिणारे येथे येऊन बिनधास्तपणे मद्यपानाची मैफील रंगवत आहेत. त्यांना कोणी हटकतही नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे दारूच्या बाटल्या सर्वत्र पडलेल्या दिसत आहेत. मद्यपी व गर्दुल्ल्यांनी याच इमारतींना सार्वजनिक शौचालय बनविले आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथील पत्रा, खिडक्यांची लोखंडी तावदाने व इतर सर्व प्रकारचे भंगारही गर्दुल्ल्यांनी विकले आहे. हाकेच्या अंतरावर न्यायालय बी. पी. मरीन अॅकॅडमी व खारजमीन संशोधन केंद्र व लोकवस्तीही आहे. यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधितांवर कारवाई करीत
नाही. शक्ती मिलच्या पुनरावृत्तीची शक्यता
मुंबईमध्ये शक्ती मिलच्या खंडरमध्ये झालेल्या इमारतीमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्याची पुनरावृत्ती पनवेलमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतींमध्ये होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथील अनेक खोल्यांमध्ये निरोध पडले असल्याचे दिसत असून, या जागेचा अवैध गोष्टींसाठी वापर केला जात असल्याचे बोलले जात आहे.