घणसोली आगारात बसला आग

By Admin | Updated: May 29, 2016 03:10 IST2016-05-29T03:10:36+5:302016-05-29T03:10:36+5:30

एनएमएमटीच्या आगारात उभ्या असलेल्या बसने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दोन महिन्यांपूर्वीच परिवहनच्या ताफ्यात या बस आल्या असून, अद्याप त्यांचा वापरही

Ghansoli fires fire at the fire | घणसोली आगारात बसला आग

घणसोली आगारात बसला आग

नवी मुंबई : एनएमएमटीच्या आगारात उभ्या असलेल्या बसने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दोन महिन्यांपूर्वीच परिवहनच्या ताफ्यात या बस आल्या असून, अद्याप त्यांचा वापरही सुरू झालेला नाही. त्यापूर्वीच बसची बॅटरी चार्जिंग होत असताना हा अपघात घडला आहे.
केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात २० नव्या मिडी बस दाखल झाल्या आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस परिवहनला या बस मिळालेल्या असून त्यापैकी काही बस तीन दिवसांपासून वापरात काढलेल्या आहेत. तर आगार अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसल्याने उर्वरित बस आगारात उभ्याच आहेत. लवकरच त्या बस देखील शहरातल्या विविध मार्गांवर सुरू केल्या जाणार आहेत. त्यापूर्वीच एका बसला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. एका रांगेत सर्व बस उभ्या असताना एका (एमएच ४३ एच ५४२३) बसने पेट घेतला. घटनेवेळी या बसची बॅटरी चार्जिंग करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन या आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगीमध्ये बसचे इंजन पेटल्यामुळे बसचा पुढचा भाग पूर्णपणे जळाला आहे. ही आग पसरून लगतच उभ्या असलेल्या इतर बस देखील पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु आगारातील कर्मचारी व अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य दुर्घटना टळली.
सदर घटनेची माहिती मिळताच नगरसेवक घनशाम मढवी यांनी आगारात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. परिवहनच्या ताफ्यात नव्यानेच दाखल झालेल्या बसने पेट घेणे ही धोक्याची सूचना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. जर ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी वापरात असताना आग लागली असती तर गंभीर दुर्घटना घडली असती. त्यामुळे नवीन आलेल्या सर्वच मिडी बसची तांत्रिक तपासणी करूनच त्यांच्या वापराबाबत निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ghansoli fires fire at the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.