गांजामाफिया ‘टारझन’ गजाआड
By Admin | Updated: August 31, 2016 03:43 IST2016-08-31T03:43:51+5:302016-08-31T03:43:51+5:30
अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. स्वत:ला टारझन म्हणवून घेणाऱ्या गांजामाफिया हरिदास विधातेला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे

गांजामाफिया ‘टारझन’ गजाआड
नामदेव मोरे, नवी मुंबई
अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. स्वत:ला टारझन म्हणवून घेणाऱ्या गांजामाफिया हरिदास विधातेला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून अर्धा किलो गांजा हस्तगत केला आहे. याशिवाय सानपाडा महामार्गानजीक झोपडीत गांजा विकणारा माफिया अशोक पांडे यालाही अटक केली असून या सर्वांची कसून चौकशी सुरू केली आहे.
नवी मुंबईमधील गांजा विक्री व अवैध व्यवसायांविरोधात ‘लोकमत’ने मोहीम सुरू केली होती. दोन वेळा स्टिंग आॅपरेशन करून नेरूळ, एपीएमसीचे भाजी व फळ मार्केट, धान्य मार्केटसमोरील झोपडी, महामार्गावरील झोपडीमध्ये गांजा विकला जात असल्याचे उघडकीस आणले होते. अमली पदार्थ विक्रेते तरूणांना व्यसनांच्या जाळ्यात ओढत असल्याचेही पाहणीमध्ये निदर्शनास आले होते. अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनीही जूनपासूनच अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.
आतापर्यंत त्यांनी १२ ठिकाणी धाडी टाकून १५पेक्षा जास्त आरोपींना गजाआड केले आहे. एपीएमसीच्या भाजी व फळ मार्केटमध्ये गेली १५ वर्षांपेक्षा जास्त काळ हरिदास विधाते याला अटक केली आहे. त्याच्याकडे अर्धा किलो गांजा सापडला आहे. विधाते हा स्वत:ला टारझन म्हणून घेतो. आय एम टारझन अशा शब्दात तो अनेक वेळा ओळखीच्यांवर रूबाब झाडत होता. मार्केटमध्ये परप्रांतीय मुलांकडून तो गांजा विक्री करून घेत होता. त्याचा मुलगा दत्तात्रय विधाते यालाही गांजा विक्रीप्रकरणी यापूर्वीच अटक केली होती. सद्यस्थितीमध्ये त्याला तडीपार केले आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने गांजामाफिया अशोक पांडे यालाही अटक केली आहे. परंतु त्याच्याकडे गांजाचा साठा सापडला नाही. गांजा ओढत असताना तो पोलिसांना आढळला. यामुळे गांजा जवळ बाळगला व अमली पदार्थांचे प्राशन केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला आहे. पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे शहरातील बहुतांश प्रमुख अड्डे बंद झाले आहेत. परंतु धान्य मार्केटसमोर झोपडपट्टीमध्ये व नेरूळमध्ये पोलिसांच्या नजरा चुकवून अधूनमधून गांजा विक्री होत आहे. त्यांच्यावरही पोलिसांची नजर आहे.
टारझन व अशोकला अटक केल्यामुळे गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कारवाईच्या भीतीने एपीएमसीमधील राजाने गांजा विक्री थांबविली आहे. त्याचे साथीदारही गायब आहेत. एपीएमसी प्रशासनानेही त्याला मार्केटमध्ये काहीही चुकीचे काम करताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांची ही मोहीम अशीच सुरू राहिली तर काही महिन्यात शहर अमली पदार्थांच्या विळख्यातून सुटू शकेल, असे मत दक्ष नागरिक व्यक्त करत आहेत.
अशोकचा अड्डाही जुनाच
शहरातील जुन्या गांजामाफियांमध्ये अशोक पांडेचाही समावेश आहे. सायन - पनवेल महामार्ग व कोल्ड स्टोरेजच्या मध्ये असलेल्या झोपडीत तो गांजाची विक्री करत होता. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. परंतु तो नंतर सुटून आला व पुन्हा गांजा विक्री सुरू केली होती. पोलिसांना सापडू नये यासाठी एका जागेवर साठा ठेवत नव्हता. पोलीस त्याच्यावर पाळत ठेवून होते अखेर गांजा विकताना नाही पण ओढताना तो पोलिसांना आढळताच त्याला तत्काळ अटक केली आहे.