गवळीदेव धबधबा बनला मद्यपींचा अड्डा
By Admin | Updated: July 17, 2017 01:31 IST2017-07-17T01:31:22+5:302017-07-17T01:31:22+5:30
पावसाळी पर्यटनासाठी नवी मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेला गवळीदेव परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे.

गवळीदेव धबधबा बनला मद्यपींचा अड्डा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पावसाळी पर्यटनासाठी नवी मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण असलेला गवळीदेव परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. रविवारी सुट्टी असल्याने पर्यटकांनी गर्दी केली होती. परंतु जागोजागी मद्यपींच्या मैफली पाहून अनेकांनी तेथून परत जाणे पसंत केले. येथील विहिरीमध्येही अनेक जण उतरत असून सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महापालिकेला निसर्गाचे वरदान लाभले आहे. २२ किलोमीटरचा खाडी किनारा व दिघा ते बेलापूरपर्यंतच्या डोंगररांगा आहेत. परंतु खाडी व डोंगर रांगांमध्ये पर्यटनस्थळ विकसित करण्यात महापालिका व वनविभागाला अपयश आले आहे. खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद केल्यानंतर मुंबई, ठाणे व नवी मुंबईमधील हजारो पर्यटक घणसोलीमधील गवळीदेव धबधब्यावर पावसाळी सहलीसाठी जात आहेत. शनिवार व रविवारी दोनही दिवस रोज ३ ते ४ हजार पर्यटकांनी येथे हजेरी लावली होती. पर्यटकांची गर्दी होत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी येथे काहीही उपाययोजना नाही. धबधबा परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. तरूणाई घोळका करून मद्यपान करत असल्याचे चित्र होते. मद्यपींना कोणाचीच भीती उरलेली नव्हती. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी छायाचित्र घेत असतानाही त्यांना बिनधास्तपणे फोटो काढून दिले जात होते. मद्यपींमुळे गवळीदेवला कुटुंबीयांसह गेलेल्या पर्यटकांचा भ्रमनिरास झाला. या प्रकाराविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली. निसर्गाचा व धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी आम्ही येथे आलो, परंतु मद्यपींमुळे आनंदावर विरजण पडले. भांडणे होण्याच्या भीतीमुळे येथून परत जाणे पसंत केल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
गवळीदेव धबधब्यावर जाताना जंगलामध्ये विहीर आहे. या विहिरीमध्ये अनेक तरूण उड्या मारत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. पूर्वी या विहिरीवर लोखंडी जाळी होती. परंतु चोरट्यांनी जाळी गायब केली आहे. त्यामुळे विहिरीत बुडून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पूर्वी गवळीदेवकडे जाणाऱ्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवला जात होता. पर्यटकांचे साहित्य तपासून दारू जप्त केली जात होती. परंतु सद्यस्थितीमध्ये धबधबा परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्थाच नाही. महापालिका प्रशासनाने गवळीदेवकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. याशिवाय वनविभागानेही या परिसराचा विकास करण्यासाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे असून एखादी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.