घणसोलीत उद्यानाच्या कामांना सुरुवात
By Admin | Updated: March 20, 2017 02:16 IST2017-03-20T02:16:49+5:302017-03-20T02:16:49+5:30
घणसोली कॉलनीच्या हस्तांतरणानंतर पालिकेने तिथल्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामांना गती दिली आहे.

घणसोलीत उद्यानाच्या कामांना सुरुवात
नवी मुंबई : घणसोली कॉलनीच्या हस्तांतरणानंतर पालिकेने तिथल्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामांना गती दिली आहे. यानुसार रविवारी उद्यान सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यामुळे येत्या काळात विभागातील नागरिकांच्या गैरसोयी दूर होणार असून त्यांना विरंगुळ्यासाठी सोयी-सुविधांयुक्त उद्यान उपलब्ध होणार आहे.
अनेक वर्षांपासून घणसोली विभागाच्या हस्तांतरणाचा रखडलेला प्रश्न डिसेंबर महिन्यात निकाली लागला आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सिडकोकडे पाठपुरावा करून घणसोली कॉलनीचा भाग ताब्यात घेतला आहे. हस्तांतरापूर्वी तिथल्या मूलभूत सुविधांच्या कामावरून दोन प्रशासनात कलगीतुरा सुरू होता. अखेर आहे त्या स्थितीत पालिकेने या नोडचे हस्तांतरण करून घेतले आहे. यामुळे विकासकामांवर खर्च होणारे सिडकोचे करोडो रुपये वाचले असून भविष्यात हा खर्च पालिकेला करावा लागणार आहे. हे आव्हान पेलत पालिकेने हस्तांतरणाची प्रक्रिया करून घेतल्यानंतर काही दिवसातच रस्त्याची डागडुजी केली होती. त्यानंतर उद्यानाच्या सुशोभीकरनाला सुरवात केली आहे. यानुसार सेक्टर ४ येथील पोलीस चौकीलगतच्या उद्यानासाठी आरक्षित भूखंडाच्या विकासाला सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्याच्या या कामाची सुरवात रविवारी स्थानिक नगरसेविका उषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, कृष्णा पाटील, अर्जुन गाडे, विश्वास कांबळे, संजय बांगर, आप्पा मुळे, हृषीकेश निगडे आदी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्याच्या या कामांतर्गत सदर उद्यानाचे सुशोभीकरण केले जाणार असून त्यासाठी पालिकेतर्फे १६ लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. यापूर्वी सिडकोच्या दुर्लक्षामुळे उद्यानासाठी आरक्षित असलेल्या या भूखंडाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यात सुधार करून दुसऱ्या टप्याच्या कामांतर्गत उद्यानात झाडांची लागवड करून विरंगुळ्याचे साहित्य बसवले जाणार आहे. (प्रतिनिधी)