उरणमध्ये गांजा पकडला
By Admin | Updated: March 17, 2017 05:53 IST2017-03-17T05:53:48+5:302017-03-17T05:53:48+5:30
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील उरण दादरपाडा येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत, सुमारे दीड किलो वजनाचा गांजा

उरणमध्ये गांजा पकडला
उरण : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील उरण दादरपाडा येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत, सुमारे दीड किलो वजनाचा गांजा व रोख रक्कम असा एकूण १५,१९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. घटनेतील आरोपीस अटक करण्यात आली असल्याची माहिती तपासी पोलीस अधिकारी शेलार यांनी दिली.
अमली पदार्थांच्या विळख्यात नवी तरु णाई दिवसेंदिवस जात आहे. त्यामुळे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. यामध्ये सातत्याने खबऱ्यांकडून माहिती घेत धाडसत्र सुरू आहे. उरण जेएनपीटी परिसरात परप्रांतीयांनी या धंद्यात बस्तान मांडले असल्याचे बोलले जाते. मात्र, आता स्थानिकही सहभागी असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाने कंबर कसली आहे.
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार व पोलीस नाईक जाधव, भालेराव, पो.हवा. पिरजादे, चालक सांगोलकर असे पथक बुधवार, १५ मार्च रोजी दुपारी १.४५ वाजताचे सुमारास संशयित ठिकाणी पोहोचले. आधीच सापळा रचून ठेवला असल्याने सावज अलगद फसले. चिर्ले-दिघोडे मार्गावरील दादरपाडा या गावातील कमलाकर गायकवाड (५९, रा. दादरपाडा-दिघोडे ता. उरण) याच्या घरातून १ किलो ४०० ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ चोरून विक्र ी करत असल्याचे पथकास आढळले. या व्यक्तीकडे असलेले अमली पदार्थ व रोख रक्कम ११९० रुपये असा एकूण १५,१९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत पोलीस नाईक राजेश गाढवे (अमली पदार्थ विरोधी पथक नवी मुंबई) यांनी उरण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता, आरोपी विरोधात एन. डी. पी. एस. अॅक्ट सन १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. यात आरोपीला पोलीस कस्टडी दिली असून, गुरु वारी उरण न्यायालयात हजर करत रिमांड घेणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे तपासी अंमलदार अमित शेलार यांनी दिली. रायगडचा गांजामाफिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीचे मोठे नेटवर्क आहे. बऱ्याच वर्षांपासून या धंद्यात असलेला कमलाकर पोलिसांना तुरी देत होता. स्थानिक असल्याने जेएनपीटी द्रोणागिरी परिसरात त्याने चांगला जम बसवला होता. (वार्ताहर)