सन्मित्र मंडळाचा गणेशोत्सव पर्यावरणस्नेही
By Admin | Updated: September 7, 2016 03:03 IST2016-09-07T03:03:01+5:302016-09-07T03:03:01+5:30
लोकमान्य टिळकांनी सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याच्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याच आवाहनास अनुसरून अलिबाग शहरातील

सन्मित्र मंडळाचा गणेशोत्सव पर्यावरणस्नेही
जयंत धुळप, अलिबाग
लोकमान्य टिळकांनी सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याच्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याच आवाहनास अनुसरून अलिबाग शहरातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ १९६२ मध्ये सन्मित्र मंडळ या मंडळाने रोवली. तेव्हापासून हिंदू-मुस्लीम एकात्मतेची सुरू झालेली ही अनोखी परंपरा यंदा ५४ व्या वर्षात पोहोचली आहे. यंदा मंडळाच्या सदस्यांनी श्रींची अत्यंत आकर्षक मूर्ती फायबरची बनवून घेवून, यंदापासून केवळ पूजेच्या छोट्या मूर्तीचे विसर्जन होईल आणि फायबरची गणेशमूर्ती पुढील गणेशोत्सवाकरिता सांभाळून ठेवून, पर्यावरणाच्या ऱ्हासावर यातून मात करुन यंदापासून पर्यावरणस्नेही सार्वजनिक गणेशोत्सव करण्यात येत असल्याची माहिती अलिबागचे नगराध्यक्ष आणि सन्मित्र मंडळ, भाजीमार्केट, अलिबाग या मंडळाचे प्रशांत नाईक यांनी दिली आहे.
५४ वर्षांपूर्वी अलिबाग भाजीमार्केटमधील हिंदू, मुस्लीम, जैन, मारवाडी अशा सर्वधर्मीय तत्कालीन तरुण व्यापारी मित्रांनी एकत्र येवून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुळातच जातीय सलोख्याचे तत्कालीन गाव आणि आताचे शहर असणाऱ्या अलिबागमधील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षस्थान मुस्लीम समाजातील परंतु संपूर्ण अलिबागकरांना आदराचे असणारे सामाजिक व गांधावादी कार्यकर्ते पापाभाई पठाण यांच्याकडे सुपूर्द करुन हिंदू-मुस्लीम एकात्मतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अलिबागकरांनी ५४ वर्षांपूर्वी उभ्या महाराष्ट्रासमोर ठेवल्याने, या सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत सर्वांनाच मोठे औत्सुक्य असते.
आपल्या ज्येष्ठांच्या पिढीने हिंदू-मुस्लीम एकात्मतेचा हा सार्वजनिक गणेशोत्सव त्यांच्या पुढच्या पिढीकडे सुपूर्द केला. त्या पिढीनेही एकात्मतेची परंपरा अबाधित राखून तो आता आमच्या पिढीकडे सुपूर्द केला असल्याचे मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अश्विन लालन यांनी सांगितले.