लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात नवी मुंबईत अनागोंदी कारभार माजल्याची खंत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली. शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या. त्या सहन करून आपण वेळ मारून नेल्याचेही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच सांगितले, तर काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टी आपण वेळोवेळी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निदर्शनात आणून दिल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांतर्फे वाशी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर नाईक यांनी भावना व्यक्त केल्या. मोठा एक्सल ज्या दिशेला जाईल, त्याच दिशेला छोटा एक्सल जातो असे उदाहरण देऊन त्यांनी त्या काळात काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागल्या असल्याचे म्हणाले.
गतकाळातील पोलिस अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष हल्ला
भविष्यात महाराष्ट्राचे अर्थकारण, औद्योगिकरण, शिक्षण व आरोग्य यात महाराष्ट्र अग्रेसर राहील असेही ते म्हणाले. सगळेच आपल्या इच्छेनुसार काम करणार नाहीत, उडदामागे काळे गोरे असतात, अशांना नजरेत ठेवून आयुक्त मिलिंद भारंबे यांना तुमच्या घटकाचे काहीतरी चुकीचे चालले असल्याचे निदर्शनात आणून दिल्याचेही ते म्हणाले. वनमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गणेश नाईक प्रथमच नवी मुंबईतील कार्यक्रमात बोलत होते.