दुष्काळग्रस्तांना गणेश मंडळांचा मदतीचा हात
By Admin | Updated: September 20, 2015 00:00 IST2015-09-20T00:00:05+5:302015-09-20T00:00:05+5:30
गणेश मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन लोकमतने केल्यानंतर नवी मुंबई, पनवेलमधून मदतीचे हात पुढे येवू लागले आहेत. नेरूळ मधील लोकमान्य टिळक

दुष्काळग्रस्तांना गणेश मंडळांचा मदतीचा हात
नवी मुंबई : गणेश मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन लोकमतने केल्यानंतर नवी मुंबई, पनवेलमधून मदतीचे हात पुढे येवू लागले आहेत. नेरूळ मधील लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समितीने ५१ हजार रूपयांची मदत केली असून शहरातील काही व्यवसायीकांनी १ कोटी रूपये देण्याचे निश्चीत केले आहे.
राज्यात भिषण दुष्काळाची स्थिती आहे. पाऊस वेळेत न पडल्यामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. शेतकरी संकटात असल्यामुळे यावर्षी गणेश उत्सवामध्ये जास्त खर्च न करता दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन सामाजीक कार्यकर्त्यांनी केले आहे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनीही यासाठी पुढाकार घेतल्यामुळे मदतीचे हात पुढे येवू लागले आहेत. नवी मुंबईमधील मंडळांनाही याविषयी आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पनवेलमधील विघ्नहर्ता गणेश मंडळाने नाना पाटेकर यांच्याकडे २५ हजार रूपयांचा धनादेश सुपुर्द केला आहे. त्यांनी केलेल्या सुरवातीनंतर अनेक गणेश मंडळांनी खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील माथाडी कामगारही गणेश उत्सव साध्यापद्धतीने साजरा करून नाम फाऊंडेशनकडे मदत सुपुर्द करणार आहेत. नेरूळ सेक्टर १० मधील लोकमान्य टिळक जनकल्याण उत्सव समिती प्रत्येक वर्षी उत्सवातून जनजागृतीचे काम करत आहे. सामाजीक संदेश देणारा देखावा करण्यात येतो. यावेळी गणेश मंडळ दुष्काळग्रस्तांसाठी ५१ हजार रूपये देणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख माजी सिडको संचालक नामदेव भगत यांनी दिली आहे. गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भावीकांनाही दुष्काळग्रस्तांना मदत करावी असे आवाहन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबईमधील बांधकाम व इतर क्षेत्रातील व्यवसायीकांनी दुष्काळग्रस्तांना मोठी मदत करण्याचे निश्चीत केले आहे. १ कोटी रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात येणार आहे. मदत निधी जमा झाला असून मान्यवरांची वेळ घेवून तत्काळ तो त्यांच्याकडे सुपुर्द केला जाणार असल्याची माहिती या कामामध्ये पुढाकार घेणाऱ्या व्यवसायीकांनी दिली. राज्यातील शेतकरी संकटात असताना त्यांना मदत करणे कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येक व्यवसायीकांनी आपल्या पद्धतीने मदत करावी असे आवाहन या माध्यमातून केले जाणार आहे.