यंदा गणेशोत्सवात सत्तावीस ताल वाजणार
By Admin | Updated: August 20, 2016 04:51 IST2016-08-20T04:51:49+5:302016-08-20T04:51:49+5:30
मराठमोळ््या परंपरेनुसार सण-उत्सव साजरा करण्यासाठी ढोल-ताशा पथकांची साद आवश्यक आहे. डीजे संस्कृतीला मागे टाकत राज्यातील ढोल-ताशा पथकांनी मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न

यंदा गणेशोत्सवात सत्तावीस ताल वाजणार
- प्राची सोनवणे, नवी मुंबई
मराठमोळ््या परंपरेनुसार सण-उत्सव साजरा करण्यासाठी ढोल-ताशा पथकांची साद आवश्यक आहे. डीजे संस्कृतीला मागे टाकत राज्यातील ढोल-ताशा पथकांनी मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला आहे. बाप्पाच्या आगमनाला अवघे काहीच दिवस उरले असून ढोल-ताशा पथकांची जोरदार तयारी सुरु आहे.
मोठमोठ्या गणेश मंडळांच्या आगमन सोहळ््याला सुरुवात झाली असून मुंबईतील ढोल-ताशा पथकांना आगमन सोहळ््याचा मान मिळाला आहे. वाद्य पूजनाने पथकाने जोरदार तयारीला सुरुवात केली असून नवी मुंबईतील उत्सव ढोल-ताशा पथकाच्या वतीने यंदा सत्तावीस ताल सादर करणार असल्याची माहिती पथक प्रमुखांनी सांगितली. पथकांमध्ये महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महिला सुरक्षेचीही तितकीच दखल घेतली जात असल्याची माहिती ढोल-ताशा पथकांनी दिली आहे. ऐरोलीतील नादगर्जा ढोल-ताशा पथकाने काहीच महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडविले. गणेशोत्सवासाठी ढोल-ताशा पथकांनी नवनवे ताल तयार केले आहेत. ढोल-ताशा पथकांच्या वेशभूषाही मराठमोळ््या पध्दतीच्या असून महिलांसाठी नऊवारी साडी आणि फेटे, पुरुषांसाठी सदरा असा आहे. नुकताच शहरातील ढोल ताशा पथकांचा वाद्यपूजन सोहळा पार पडला असून सरावाला सुरुवात झाली आहे.
यंदा पथकामध्ये तरुणांबरोबरच वयोवृध्दही उत्साहाने सहभागी झाले आहेत. तरुणांना लाजविणारा उत्साह ज्येष्ठांमध्ये पहायला मिळत असल्याची माहिती पथकाच्या सदस्यांनी दिली. सरावादरम्यान नागरिकांना कसलाही त्रास होता कामा नये याची पुरेपूर दखल घेतली जाते. रहिवासी संकुलापासून दूरच्या अंतरावर सराव केला जात आहे. ढोल-ताशा पथकामध्ये चिमुरड्यांपासून ते वयोवृध्दांचा समावेश असून प्रत्येकाला प्रशिक्षण दिले जाते. ढोल-ताशाबरोबरच इतर पारंपरिक वाद्यांचाही समावेश आहे.
डीजे संस्कृतीला मागे टाकणार
पाश्चिमात्य डीजे संस्कृतीपेक्षा मराठी ढोल-ताशांमध्ये असलेले वेगवेगळे ताल त्याला पारंपरिक वाद्यांनी दिलेली साद याचे प्रात्यक्षिक नवी मुंबईकरांना पहायला मिळणार आहे. आगमन सोहळ््यात मराठी अस्मितेचा झेंडा फडकविणार असून मराठी संस्कृती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असल्याची माहिती पथकांच्या सदस्यांनी दिली.
नोकरी करून पथकाचे नेतृत्व
खारघरमधील उत्सव ढोल- ताशा पथकाचा प्रमुख आशिष बाबर याने दिलेल्या माहितीनुसार पथकातील सदस्य नोकरी करून ढोल- ताशा वाजविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. वेळात वेळ काढून न चुकता सराव केला जात आहे. या पथकात ६०हून अधिक महिलावर्गाचा समावेश असून गेल्या वर्षीच्या तुलनेत पथकातील मुलींची संख्या दुपटीने वाढल्याचे आशिषने सांगितले. यंदाचा रंगारी बदक चाळ आगमन सोहळ््याचा मान या पथकाला मिळाला आहे.