गणपती बाप्पाचे आगमन यंदाही खड्ड्यांतूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:44 AM2017-08-19T02:44:13+5:302017-08-19T02:44:24+5:30

बाप्पांचे आगमन अवघ्या पाच दिवसांवर येवून ठेपले आहे. त्यानुसार गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे.

Ganapati Bappa's arrival is not available till date | गणपती बाप्पाचे आगमन यंदाही खड्ड्यांतूनच

गणपती बाप्पाचे आगमन यंदाही खड्ड्यांतूनच

Next

नवी मुंबई : बाप्पांचे आगमन अवघ्या पाच दिवसांवर येवून ठेपले आहे. त्यानुसार गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. परंतु शहरातील बहुतांशी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे मान्सूनपूर्व रस्त्यांची डागडुजी केली गेली नाही. पावसामुळे बहुतांशी रस्ते उखडले गेले आहेत. त्यामुळे यावर्षी सुध्दा बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न निर्माण झाले आहे.
दर्जेदार पायाभूत सुविधांचा गवगवा करणाºया महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या दुरवस्थेकडे मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. याचा परिणाम म्हणून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची वाताहत झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाहनधारकांना तर अक्षरश: कसरत करावी लागत आहे. विविध सामाजिक संस्था व दक्ष नागरिकांनी यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. परंतु प्रशासनाने या तक्रारींना केराची टोपली दाखविली. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. परंतु तेही तकलादू स्वरूपाचे ठरले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत खड्ड्यांच्या पायघड्यांनी करण्याची वेळ गणेशभक्तांवर आली आहे.
सायन-पनवेल महामार्गाची तर अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलासह त्याच्या खालून वसाहतीकडे जाणारे रस्ते पूर्णत: उखडले आहेत.
ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपुलाच्या कुर्मगती कामाचा फटका वाहतुकीला बसला आहे. प्रमुख रस्त्यांसह वसाहतीअंतर्गत रस्त्यांचीही दैना उडाली आहे. यापूर्वी उत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांची युध्दपातळीवर डागडुजी करण्याची प्रथा होती. परंतु विद्यमान प्रशासनाने यावर्षी ही प्रथा मोडीत काढल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी संताप व्यक्त केला आहे.
>सायन-पनवेल महामार्गाची डागडुजी
सायन-पनवेल महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. महामार्गावरील उड्डाणपूल तर वाहतुकीला धोकादायक बनले आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी या मार्गाची पाहणी केली. गणेशोत्सवापूर्वी या मार्गाची डागडुजी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारपासून महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
>राज्य शासनाने घेतली दखल
शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत वाशी येथील एका जागरूक नागरिकाने गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेत नगरविकास विभागाने रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. परंतु वर्ष उलटले तरी यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही.

Web Title: Ganapati Bappa's arrival is not available till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.