गणेशोत्सवाकरिता सर्व परवानग्या आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:30 IST2017-07-29T02:29:48+5:302017-07-29T02:30:08+5:30

पनवेल महापालिका हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना यंदा विविध परवानग्यांकरिता शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याची गरज पडणार नाही.

ganaesaotasavaakaraitaa-sarava-paravaanagayaa-aennalaaina | गणेशोत्सवाकरिता सर्व परवानग्या आॅनलाइन

गणेशोत्सवाकरिता सर्व परवानग्या आॅनलाइन

कळंबोली : पनवेल महापालिका हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना यंदा विविध परवानग्यांकरिता शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याची गरज पडणार नाही. या सर्व परवानग्या आॅनलाइन मिळणार आहेत. त्याकरिता महापालिका प्रशासनाने पोर्टल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर आणि तळोजा परिसरात खासगी गणपतींबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मोठी आहे. मंडळाच्या वतीने मंडप, पंडाल टाकण्याबरोबर डेकोरेशन, देखावे उभारले जातात. याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था, महावितरण, स्थानिक पोलीस, वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी लागते आणि त्यासाठी याकरिता संबंधित कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागतात. अनेकदा मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अडवणूकसुद्धा केली जाते. तसेच ना हरकत देण्यासाठी विलंब लावला जातो. या सर्व गोष्टींचा विचार करून महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी या सर्व परवानग्या एकाच वेळी एकाच ठिकाणी मिळाव्यात अशी सूचना सर्व शासकीय यंत्रणांना दिल्या आहेत. त्याचबरोबर मंडळाच्या पदाधिकाºयांना हेलपाटे मारायला लागू नये याकरिता परवानगी देण्याकरिता आॅनलाइन सुविधा करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. याकरिता खास पोर्टल तयार करण्यात येणार आहे. शुक्रवारी महापालिकेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक बोलाविण्यात आली होती. या वेळी पोलीस, सिडको, महसूल, महापालिका, वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवाकरिता बांधण्यात येणारे स्टेज, मूर्तीची उंची किती असावी याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच या कालावधीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबतही डॉ. सुधाकर शिंदे यांनी पोलिसांना सूचना दिल्या. वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच गणेशभक्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतही वाहतूक पोलिसांना सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात अखंडित वीजपुरवठा करण्याबरोबरच मिरवणुकीच्या मार्गावर विजेच्या तारा नाहीत ना याची पडताळणी करण्याची सूचना महावितरण कंपनीच्या प्रतिनिधींना आढावा बैठकीत करण्यात आली. याशिवाय विसर्जन घाटावर लाइटची व्यवस्था करण्याबरोबरच मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश महापालिकेच्या अधिकाºयांना आयुक्तांनी दिले.

नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्या
महापालिका हद्दीत गणेशोत्सव साजरा होत असताना संबंधितांनी सर्व नियम पाळावेत, असा दंडक घालून देण्याबाबतही आयुक्तांनी उपस्थित अधिकाºयांना सूचना केल्या. त्यामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, तसेच आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत मंडळांना सूचना देण्यात याव्यात, असे डॉ. शिंदे यांनी बैठकीत सांगितले.

Web Title: ganaesaotasavaakaraitaa-sarava-paravaanagayaa-aennalaaina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.