‘त्या’ गोदाम दुर्घटनेतील आठ जणांवर अंत्यसंस्कार
By Admin | Updated: January 3, 2015 01:22 IST2015-01-03T01:22:37+5:302015-01-03T01:22:37+5:30
तालुक्यातील रहानाळ गावात मढवी कम्पाउंडमध्ये मागील आठवड्यात भंगाराच्या गोदामांना लागलेल्या आगीत आठ कामगार मृत्युमुखी पडले होते.

‘त्या’ गोदाम दुर्घटनेतील आठ जणांवर अंत्यसंस्कार
भिवंडी - तालुक्यातील रहानाळ गावात मढवी कम्पाउंडमध्ये मागील आठवड्यात भंगाराच्या गोदामांना लागलेल्या आगीत आठ कामगार मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या मृतदेहांवर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता गौरीपाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी भारतातील नेपाळ दूतावासातील सदस्य गणेश अधिकारी, शिवसेना नेपाळी श्रमिक युनियनचे अध्यक्ष मास्टर थापा, नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आकडे, आई एकवीरा देवी संस्थानचे विश्वस्त मदन भोई यांच्यासह शेकडो गोदाम कामगार उपस्थित होते.
तालुक्यातील गोदामात नेपाळ राज्यातील अनेक कामगार रोजीरोटीसाठी काम करीत आहेत. यापूर्वी कोपर गावाच्या हद्दीत अनधिकृत गोदामाची इमारत कोसळल्याने रेडिमेड गारमेंट कंपनीत काम करणारे काही कामगार मयत झाले होते. त्यानंतर, २७ डिसेंबर रोजी रहानाळ गावात भंगारच्या गोदामांना आग लागून आठ कामगार जळून मृत झाले. त्यांचे मृतदेह डीएनए चाचणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेले होते. त्या सर्व मृतदेहांवर त्यांच्या वारसांनी शुक्रवारी सायंकाळी गौरीपाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
नेपाळी दूतावासाचे सदस्य गणेश अधिकारी हे या अंत्यसंस्कारांस उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, ‘नेपाळचे रहिवासी रोजीरोटीसाठी देशातील विविध भागांत काम करतात. परंतु, अशा दुर्दैवी दुर्घटनेमध्ये त्यांचा बळी जाऊन त्यांच्या कुटुंबाची हानी होते. या मृतांच्या वारसांना भारत सरकार व राज्य सरकारने नुकसानभरपाई द्यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’ (प्रतिनिधी)