‘रोहयो’साठी निधी कमी पडणार नाही
By Admin | Updated: March 17, 2017 05:54 IST2017-03-17T05:54:35+5:302017-03-17T05:54:35+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही. परिणामी, अधिकाधिक कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत

‘रोहयो’साठी निधी कमी पडणार नाही
अलिबाग : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही. परिणामी, अधिकाधिक कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. कामे घेताना काही निकष अडचणीचे ठरत असतील, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या निकषात बदल करता येतील, असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्र ममंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी येथे बोलताना दिले.
केंद्र सरकार पुरस्कृत योजनांतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी रायगड जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात गीते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रायगड जिल्ह्यात मनरेगाची ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून ४ हजार ९२ तर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून २ हजार ५९५ अशी एकूण ६ हजार ६८७ कामे प्रस्तावित असून त्यापैकी १४४ कामे जिल्ह्यात प्रत्यक्ष सुरू आहेत. योजनेच्या निकषांमधील काही अडचणींमुळे कामे होऊ शकत नसल्याचे बैठकीत लक्षात आल्यावर गीते यांनी निकष बदलाबाबत निर्देश दिले आहेत.
जनकल्याणासाठी केंद्र शासनामार्फत अर्थसाहाय्य असलेल्या अनेक योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून योजना अधिकाधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी उपयुक्त आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी भाग घ्यावा. योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१८ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे नियोजन आहे. यादृष्टीने संबंधित यंत्रणेने काम करावे, असेही गीते यांनी सांगितले.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुरू असलेली कामे मे २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच जी कामे अद्याप सुरू नाहीत ती तत्काळ सुरू करावीत, असे त्यांनी सांगून जिल्ह्यात असलेल्या खाड्यांमधून जलप्रवासी वाहतूक करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस पंचायत समित्यांचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, समितीचे सदस्य तसेच जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच जिल्ह्यातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांनी आभार मानले.