बाजार समितीवर पूर्ण वेळ प्रशासक
By Admin | Updated: March 17, 2017 06:00 IST2017-03-17T06:00:25+5:302017-03-17T06:00:25+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक म्हणून सतीश सोनी यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला. दोन वर्षांनंतर पूर्ण वेळ प्रशासक मिळाला असल्याने

बाजार समितीवर पूर्ण वेळ प्रशासक
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक म्हणून सतीश सोनी यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला. दोन वर्षांनंतर पूर्ण वेळ प्रशासक मिळाला असल्याने अनागोंदी थांबून एपीएमसीच्या कारभारामध्ये पारदर्शकता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शासनाने दोन वर्षांपूर्वी बाजार समितीच्या प्रशासक पदावर मनोज सौनिक यांची नियुक्ती केली होती. पण सौनिक यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते आठवड्यातून एकच दिवस प्रत्येक बाजार समितीमध्ये येत होते. पूर्ण वेळ प्रशासक नसल्याने कामकाज गतीने होत नव्हते. यामध्येच मसाला मार्केटमधील एका बड्या कंपनीला सेसमधून दिलेली सूट. डॉग स्कॉड घोटाळा, दिवसेंदिवस कमी होत चाललेला महसूल व इतर अनागोंदी कारभारामुळे संस्थेची बदनामी होवू लागली होती. यामुळे पूर्ण वेळ अधिकारी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
सतीश सोनी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्यामुळे आता एपीएमसीच्या कामकाजामध्ये शिस्त येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सतीश सोनी यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला. या वेळी माजी सचिव सुधीर तुंगार, विद्यमान सचिव शिवाजी पहिनकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कर्मचारी व व्यापारी संघटनांनी सोनी यांचे स्वागत केले. प्रशासकांनी पहिल्याच दिवशी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेवून बाजार समितीच्या कामकाजाविषयी आढावा घेतला असून त्यांच्या कार्यपद्धतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)