वनजमीन देण्याच्या बहाण्याने ८० लाखांची फसवणूक तोतया सीबीआय कर्मचाऱ्यावर गुन्हा

By सूर्यकांत वाघमारे | Published: May 19, 2024 07:35 PM2024-05-19T19:35:33+5:302024-05-19T19:35:49+5:30

कोर्टासह वनविभागाच्या बनावट पत्रांचा वापर

Fraud of 80 lakhs on the pretext of providing forest land, crime against a fake CBI employee | वनजमीन देण्याच्या बहाण्याने ८० लाखांची फसवणूक तोतया सीबीआय कर्मचाऱ्यावर गुन्हा

वनजमीन देण्याच्या बहाण्याने ८० लाखांची फसवणूक तोतया सीबीआय कर्मचाऱ्यावर गुन्हा

नवी मुंबई- वनविभागाची पडीक ५०० एकर जमीन नावावर करून देतो सांगून फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. स्वतःला सीबीआयचा कर्मचारी सांगणाऱ्या व्यक्तीने कोल्हापूरच्या ठेकेदारासह त्याच्या मित्राची ८० लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

कोल्हापूर येथे राहणाऱ्या प्रसाद घोरपडे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांचा कळंबोली येथे कार्गो ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून त्यातून कोरेगावच्या सुनील धुमाळ याच्यासोबत ओळख झाली होती. यावेळी लाल दिव्याच्या गाडीतून फिरणाऱ्या धुमाळ याने तो सीबीआय मध्ये कॉन्स्टेबल चालक असल्याचे सांगितले होते. तसेच लाल दिव्याची गाडी घेऊनच तो अनेकदा त्यांच्या भेटीला येत असे. यादरम्यान त्याने ७० ते ८० लाखात वनविभागाची जमीन नावावर करून मिळेल असे घोरपडेंना सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून घोरपडे यांनी त्यांचा मित्र प्रसाद जैन याच्या मदतीने दोघे मिळून आजरा येथील ५०० एकर वनजमीन नावावर करून घेण्याची तयारी दाखवली होती.

यासंदर्भात त्यांची सीबीडी येथील शासकीय निवासस्थानात बैठक देखील झाली असता त्याठिकाणी त्याला रोख व ऑनलाईन असे टप्प्या टप्प्याने ८० लाख रुपये देण्यात आले. यानंतर धुमाळ याने त्यांना भारत सरकारची जमीन हस्तांतरणाचे ना हरकत पत्र व सिटी सिव्हिल दिंडोशी कोर्टाचे आदेशाचे पत्रही दिले होते. परंतु जमीन हस्तांतरणाची अंतिम आदेश देण्यात उशीर होऊ लागल्याने त्यांनी अधिक चौकशी केली. त्यामध्ये कोर्ट आदेश, भारत सरकाचे पत्र बनावट असल्याचे समोर आले.

त्यानंतरही तो घेतलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करू लागल्याने त्यांनी सीबीआय कार्यालयात चौकशी केली असता त्याचे वापरलेले ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले. यावरून तो सीबीआय कर्मचारी नसतानाही लाल दिव्याची गाडी वापरून तो शासकीय कर्मचारी असल्याचा बनाव करून फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी त्याच्या विरोधात सीबीडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Fraud of 80 lakhs on the pretext of providing forest land, crime against a fake CBI employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.