वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक, ४८ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 00:26 IST2020-03-02T00:26:17+5:302020-03-02T00:26:22+5:30
एका व्यक्तीची तब्बल ४८ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोली परिसरात घडला आहे.

वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक, ४८ लाखांचा गंडा
पनवेल : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देतो, असे सांगून एका व्यक्तीची तब्बल ४८ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोली परिसरात घडला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर येथील सुनील श्रीपाद सावंत यांचा मुलगा आदित्य याने २०१६ मध्ये एमबीबीएसची पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी चौकशी करीत असताना त्यांच्या एका डॉक्टर मित्राने अमेय कस्तुरे यांच्यामार्फत एमजीएम कामोठे येथे प्रवेश मिळाला असल्याची माहिती दिली. त्यामुळे सावंत यांनी आदित्यच्या प्रवेशासाठी कस्तुरे यांच्याशी संपर्क साधला. २०१९-२० साठी मॅनेजमेंट कोट्यातून एमडीसाठी प्रवेश देतो, असे सांगून एक कोटी रुपयांची मागणी केली. त्यानुसार त्यांनी पाच लाख रुपयांचे टोकन दिले. त्यानंतर पहिल्या वर्षाची फी आणि डोनेशन म्हणून २५ लाख ५० हजार रुपये कस्तुरे यांच्याकडे देण्यात आले. २०१९ पर्यंत सावंत यांनी तब्बल ४८ लाख १९ हजार रुपये आरटीजीएस, एनईएफटी व रोख रकमेच्या स्वरूपात कस्तुरे यांना दिले. मात्र, मुलाचा प्रवेश झालाच नाही. कस्तुरेकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत काम लवकर होईल, असे सांगितले. मात्र, प्रवेश न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सावंत यांनी अमेय कस्तुरे याच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.
>तारीख उलटूनही प्रवेश नाही
२०१९ पर्यंत सावंत यांनी तब्बल ४८ लाख १९ हजार रुपये आरटीजीएस, एनईएफटी व रोख रकमेच्या स्वरूपात कस्तुरे यांना दिले. मात्र, मुलाचा प्रवेश झालाच नाही. अंतिम तारीख उलटून गेली तरी प्रवेश न झाल्याने सावंत यांना संशय आला.