गुंजाळांचे चार मारेकरी शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 03:51 IST2015-12-28T03:51:57+5:302015-12-28T03:51:57+5:30

नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांना हवे असलेले चारही मारेकरी पोलिसांपुढे रविवारी रात्री शरण आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले

Four assassins of Gunjal | गुंजाळांचे चार मारेकरी शरण

गुंजाळांचे चार मारेकरी शरण

पंकज पाटील,अंबरनाथ
नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांना हवे असलेले चारही मारेकरी पोलिसांपुढे रविवारी रात्री शरण आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस या चौघांची चौकशी करीत असल्याचे समजते. उद्या(सोमवारी) सकाळी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. हे चारही आरोपी मोरीवली गावातील रहिवासी असून, गावातील वादातूनच ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेना नगरसेवक गुंजाळ यांची मोरीवली उद्यानासमोर काही मारेकऱ्यांनी चॉपर व तलवारीने हत्या केली होती. या हत्येत वापरण्यात आलेली गाडी ही मोरीवली गावातील असल्याने, हत्येचे धागेदोरे हे मोरीवली गावाभोवतीच फिरत होते. मात्र, फिर्यादीने १३ आरोपींची नावे दिल्याने या १३ पैकी नक्की किती व्यक्तींचा या हत्येत सहभाग होता हे निश्चित करणे पोलिसांपुढील आव्हान होते. ११ व्यक्तींची नावे संशयित म्हणून घेतली गेली असली, तरी हत्येच्या ठिकाणी ४ ते ५ मारेकरीच होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. विश्वसनीय माहितीनुसार, रविवारी रात्री पोलिसांपुढे शरण आलेल्यांत, सचिन चव्हाण, संदीप गायकर, विशाल जव्हेरी, दीपक काळींबे यांचा समावेश आहे. या कथित आरोपींनी शरण येताना, अंबरनाथ पोलीस स्टेशनऐवजी टिटवाळा पोलिसांकडे हजर होणे पसंत केले. इतर नऊ जणांची चौकशी सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Four assassins of Gunjal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.